सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नसतानाच, सिंधुदुर्गातील ओसरगाव (ता. कणकवली) टोल नाक्यावरून पुन्हा एकदा टोल वसुली सुरू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने तीव्र केल्या आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही वसुली सुरू होण्याची शक्यता असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) यासाठी निविदा मागविल्या आहेत. उद्या २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे.

​ओसरगाव टोल नाक्यावरून जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही टोल वसुली केली जाईल. यापूर्वी १४ जून २०२३ रोजी येथे टोल वसुली सुरू करण्यात आली होती, मात्र टोल विरोधी कृती समिती आणि राजकीय पक्षांच्या तीव्र आंदोलनामुळे ती बंद करावी लागली होती. आता तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय झाली आहे. या नाक्यावरून वर्षाला ५७.८८ कोटी रुपयांचा टोल वसूल होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार, कार, जीप आणि व्हॅनसाठी एकेरी प्रवासाला १२५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १९० रुपये मोजावे लागणार आहेत. सिंधुदुर्गात नोंदणीकृत असलेल्या स्थानिक वाहनांसाठी ६५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी २०० रुपये (एकेरी), बस आणि ट्रकसाठी ४२५ रुपये, तर अवजड वाहनांसाठी ६६५ रुपये मोजावे लागतील. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांमध्ये कार आणि हलक्या वाहनांचे प्रमाण सर्वाधिक ४९ टक्के आहे.

महामार्ग विभागाने जाहीर केलेल्या निविदेत स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्णतः वगळण्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. केवळ नोंदणीकृत स्थानिक वाहनांसाठी सवलतीचा दर दिला आहे. यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांना या टोलचा आर्थिक फटका बसणार आहे.

यासाठीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले : दरम्यान, या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावर कडक टीका केली आहे. “महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. रस्ता अपूर्ण असताना टोल वसुली करणे चुकीचे आहे. कणकवली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग अपूर्ण राहिल्याबद्दल माफी मागितली आणि दुसऱ्या बाजूला टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या, हे दुर्दैवी आहे,” असे नाईक यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत म्हटले. महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.