चिपळूण रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांचे विघ्न कायम असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महामार्गाचा भाग पुन्हा खचून मोठा खड्डा पडला असून, दोन चारचाकी वाहनांचे टायर त्यात अडकल्याने किरकोळ अपघात झाला. दुसरीकडे खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यात पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही सुरूच असून, रस्त्यावर थेट पाण्याचे फवारे येत असल्याने मार्ग निसरडा झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने या दोन्ही ठिकाणच्या समस्यांमुळे महामार्गाच्या दर्जाबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सावर्डे येथील आरती स्वीट्ससमोर यापूर्वी महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. त्यात वाहने आदळून अनेकदा अपघात झाले होते. स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समस्या तातडीने न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठिकाणी वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम केले होते. मात्र, दुरुस्ती झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच पुन्हा महामार्गाचा भाग खचल्याने ‘दुरुस्तीवर दुरुस्ती कशासाठी?’ असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रविवारी रात्री महामार्गाचा एक भाग अचानक खचून मोठा खड्डा पडला. रात्रीच्या अंधारात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने दोन चारचाकी वाहनांचे टायर त्यात अडकले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाने त्या भागातील वाहतूक बंद करून संबंधित एजन्सीला तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या.
कशेडी बोगद्यात पाण्याचे फवारे
मुंबई-गोवा महामार्गावरील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न कशेडी बोगद्यातील पाण्याच्या गळतीचा आहे. बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले असले तरी पावसाळा सुरू होताच दोन्ही बोगद्यांच्या छतासह भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे. काही ठिकाणी पाण्याचे फवारे थेट रस्त्यावर येत असल्याने मार्ग ओला आणि निसरडा झाला आहे.
गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पाण्याचा पाझर सुरूच असल्याने करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ओल्या रस्त्यावर अचानक ब्रेक लावल्यास वाहने घसरण्याची शक्यता असून, गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहनांची संख्या आणि वेगवान वाहतूक यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.
वरवरची डागडुजी नको; कायमस्वरूपी उपाय हवा
महामार्गावर वारंवार रस्ता खचणे, खड्डे पडणे, केलेली दुरुस्ती पुन्हा उखडणे आणि कशेडी बोगद्यातील गळती न थांबणे यामुळे महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ वरवरची डागडुजी न करता रस्ता खचण्यामागील तांत्रिक कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लाखो प्रवासी या मार्गावरून कोकणात ये-जा करणार आहेत. त्यामुळे सावर्डेतील रस्ता खचण्याची समस्या आणि कशेडी बोगद्यातील निसरड्या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याऐवजी त्यापूर्वीच सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालक आणि कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे.
‘दुरुस्तीवर दुरुस्ती कशासाठी?’
“महामार्गावर यापूर्वी निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली असतानाच त्याच परिसरात पुन्हा रस्ता खचल्याने ‘दुरुस्तीवर दुरुस्ती’ करण्याची वेळ का येत आहे, असा सवाल निर्माण होतो. गणेशोत्सवाच्या काळात लाखो प्रवासी या मार्गावरून कोकणात ये-जा करणार असल्याने महामार्ग विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाय करावा.” — नीलेश खापरे, सामाजिक कार्यकर्ते, असुर्डे
‘गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती पूर्ण करू’
“सावर्डे येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, तेथील वाहतूक बंद केली आहे. रस्ता दुरुस्तीच्या सूचना संबंधित एजन्सीला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.” — श्याम खुणेकर, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
‘गळतीची गतवर्षीही डागडुजी; समस्या पुन्हा कायम’ “लाखो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचेच झाले आहे. कशेडी बोगद्याची गतवर्षी डागडुजी करण्यात आली होती; मात्र पुन्हा तीच समस्या सुरू झाली आहे. या भागातील रस्ता निसरडा झाल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.” — मकरंद उत्तेकर, वाहनचालक, खेड
