अलिबाग- मुंबई गोवा महामार्गाचे काम जोपर्यंत शंभर टक्के पूर्ण होत नाही तोवर टोल वसूली थांबवा असा महत्वपूर्ण ठराव अलिबाग येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील मागणीबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समिती बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, यांच्यासह सर्व विभागांचे खाते प्रमुख आणि शांतता समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीलाच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या टोल वसूलीचा मुद्दा उपस्थित केला. महामार्गाचे काम अपूर्ण असतांना टोल वसूली करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगीतले. आधीच महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे कोकणातील जनतेमध्ये नाराजी आहे. पळस्पे ते इंदापूर दरम्यानची कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे जोपर्यंत शंभर टक्के कामे पूर्ण होत नाहीत तो पर्यंत टोल वसूली करू नये असा ठराव त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत मांडला. त्यास रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. हा ठराव करून राज्यसरकारकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाप्रशासनाला दिले.

तसेच येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे खारपाडा येथील टोल वसूलीला काम पूर्ण होई पर्यंत स्थगिती देण्याची विनंती करणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील बाह्यवळण मार्गावरील किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी असा आमचा प्रयत्न होता. मात्र कोकण रेल्वेनी तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यास नकार दिल्याने आता हे काम पूर्ण होऊ शकणार नसल्याचेही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोगावले यांची आदित्य ठाकरेंवर टीका…

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई गोवा महामार्गाची पहाणी केली होती. या पहाणी नंतर त्यांनी राज्यसरकारवर टिका केली होती. आश्वासने दिली जातात पण मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. जे काम झाले आहे. त्याचा दर्जाही योग्य नसल्याची टिका ठाकरे यांनी केली होती. या टीकेला गोगावले यांनी गुरुवारी उत्तर दिले. काही लोक महामार्गाची पहाणी करून गेले. पेण पासून एक तासात माणगावला पोहोचले. जर महामार्ग सुस्थितीत नव्हता तर इतक्या कमी वेळात तुम्ही माणगावला कसे पोहोचलात असा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला.