अलिबाग – महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतांना मुंबई गोवा महामार्गावर टोल वसूली करण्यास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोध दर्शविवा आहे. कामे पूर्ण होत नाही तोवर टोल वसूली करू नये असेही त्या म्हणाल्या आहेत.
टोलवसूली कुठे आणि किती ?
महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोल वसूली सुरू केली आहे. चार चाकी वाहनांकडून तब्बल ९५ रुपये कर आकारणी केली जात आहे. तीन महिन्यांसाठी कल्याण इन्फ्रा या कंपनीला टोल वसूलीचे कंत्राट देण्यात आले आहे. १५ तारखेपासून टोल वसूली सुरू झाली आहे. मात्र महामार्गाची कामे अपूर्ण असतांना टोल वसूली सुरू झाल्याने, नागरीकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या ?
अशातच या टोलवसूलीला राजकीय विरोधही वाढण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि शेकाप पाठोपाठ आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही या टोलवसूलीला विरोध दर्शवली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या टोलवसूली विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
महामार्गाची कामे अपूर्ण असतांना टोल वसूली करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तशी विनंती केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर ज्यावेळी रस्त्याची काम पूर्ण होईल आणि टोल वसूली सूरू होईल तेव्हा, कोकणातील स्थानिक वाहनांना टोल वसूलीतून सूट द्यावी अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसूलीला आता विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षांकडूनही विरोध सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे.
शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाचाही टोल वसूलीला विरोध?
शिवसेना ठाकरे गटाने या संदर्भात टोलनाक्यावर निदर्शनेकडून टोल वसूल बंद करण्याची मागणी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, समीर म्हात्रे यांनी कामे पूर्ण होत नाही तोवर टोल वसूली बंद करण्याची मागणी केली. यानंतर आता इतरही राजकीय पक्षांनी टोल वसूलीविरोधात नाराजी व्य्रक्त केली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील टोल वसूलीला विरोध दर्शविला आहे.
कोलाड, नागोठणे येथील पूलांची कामे अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत, माणगाव इंदापूरच्या बाह्यवळण मार्गांची कामे रखडली आहेत. मग टोल वसूलीची घाई कशाला असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. वर्षानूवर्षे अपूर्ण असलेल्या महामार्गगावर टोल वसूली करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
