ठाणे, अलिबाग : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणार्या नागरिकांसाठी सोडण्यात आलेल्या मोफत एसटी बसगाड्या आणि गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे शुक्रवारी रात्री ठाणे आणि नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पनवेलमधील पळस्पे पुलावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला.
ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा-महापे मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, खारघर येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना या कोंडीचा मोठा फटका बसला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही प्रवाशांचे हाल झाले. टीएमटीच्या बसगाड्या तसेच रिक्षा सहज उपलब्ध होत नसल्याने स्थानकातील सॅटीस पुलावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. बसगाड्यांसाठी प्रवाशांना तब्बल २० ते २५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
कोकणात जाणार्या नागरिकांसाठी विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी समूह पद्धतीने एसटीची नोंदणी केली आहे. या एसटी बसगाड्या शुक्रवारी कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. तसेच, अनेकजण त्यांच्या खासगी वाहनानेही रायगड, रत्नागिरीच्या दिशेने निघाले. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेला बसला. ठाणे ते वाशी हे अर्धा ते पाऊण तासाचे अंतर पार करण्यास वाहनचालकांना किमान दोन तास लागले.
दरम्यान, ठाणे बाजारपेठेतही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन टीएमटीच्या बसगाड्याही त्यात अडकल्या. त्याचा परिणाम ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर झाला. बसगाड्यांसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खासगी बसच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ
मुंबई : कोकणात जाणार्या नोकरदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई महानगरातून शुक्रवारी रात्री कोकणाच्या दिशेने ३ हजार एसटी आणि ३,२०० खासगी बस रवाना झाल्या. यंदा खासगी बसच्या संख्येत १५ टक्यांनी वाढ झाली आहे. एसटी महामंडळाने घोषित केलेल्या ५,७४३ जादा गाड्याही पूर्ण क्षमतेने फुल्ल झाल्या आहेत. यात सर्वाधिक गाड्या समूह आरक्षणाच्या आहेत. शुक्रवारी ३,०२८ एसटी कोकणात रवाना झाल्या.
माणगाव, इंदापूरमध्येही वाहतूक विघ्न
मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी वाहनांची संख्या वाढल्याने माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागत होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी असतानाही काही ट्रक आणि रसायनांचे टँकर रस्त्यावर दिसून आले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली.
