रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून कोकणाकडे परतीचा प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहाने कोकणाकडे निघालेल्या वाहनांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः गजबजून गेला असून, दिवस-रात्र वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. या वाढत्या वाहतूक कोंडीचा थेट फटका महामार्गालगतच्या पेट्रोल पंपांनाही बसत असून, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
गणेशोत्सवासाठी गावाकडे परतणाऱ्या गणेशभक्तांचा लोंढा आता कोकणच्या दिशेने वेगाने सरकत आहे. मुंबई-पुणे पट्ट्यातून हजारो वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर चारचाकी, दुचाकी आणि खासगी प्रवासी वाहनांची अक्षरशः गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी वाहनांची सततची ये-जा सुरू असल्याने महामार्गावर वाहतुकीचा ताण स्पष्टपणे जाणवत आहे.
इंधनासाठीही ‘वेटिंग’!
गावाकडे जाण्याच्या घाईत प्रवासादरम्यान इंधन भरण्यासाठी वाहनचालक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर थांबत आहेत. त्यामुळे अनेक पंपांच्या प्रवेशद्वारापासूनच वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल-डिझेलसोबत सीएनजी वाहनांची संख्याही वाढल्याने काही ठिकाणी इंधन भरण्यासाठी वाहनचालकांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे.
सामान्य दिवसांच्या तुलनेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंधनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण आला आहे. वाहनांची अखंड आवक, इंधन भरण्याची प्रक्रिया आणि वाढती ग्राहकसंख्या यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे.
पुढील काही दिवसांत गर्दी आणखी वाढणार
गणेशोत्सव जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत चाकरमान्यांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासोबतच पेट्रोल पंपांवरील वाढत्या गर्दीचे नियोजन करणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. पेट्रोल पंपांवरील वाहनांच्या रांगा महामार्गावर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी वाहतूक आणि संबंधित यंत्रणांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज होत असतानाच महामार्गावर वाहनांचा महापूर आणि इंधनासाठी लागलेल्या रांगा हे यंदाच्या गणेशोत्सवाच्या वाढत्या गर्दीचे जिवंत चित्र ठरत आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही सह कुटुंब गावी कोकणात गणेशोत्सवासाठी आलो आहोत. मुंबई गोवा महामार्ग ब-यापेकी झाल्याने आम्हाला काही प्रमाणात त्रास कमी झाला. मात्र वाहतूक कोंडी कायम आहे. व इंधन तूट आज ही जाणवत आहे. संतोष परब, लांजा
