अलिबाग- रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. प्रवाश्यांनी पर्यायी महामार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते वाकण फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा लांबच लाब रांगा लागल्या होत्या. पाण्याचा निचरा होत नसल्याने महामार्गावर वाहने चालविणे अशक्य झाले होते. हीबाब लक्षात घेऊन प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महामार्ग पोलीसांनी केले होते.

पूरपरिस्थितीमुळे वाकण पाली रस्ता बंद होता. तर अलिबाग रोहा मार्गावर भिसेखिंडीत झाड कोसळल्याने, वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे महामार्गावरील गोव्याकडून येणारी वाहतुक माणगाव वरून निजामपूर मार्गे ताम्हिणी घाटातून पुण्याच्या दिशेने वळविण्यात आली होती. नंतर पुण्यातून दृतगती मार्गाने ती पुन्हा मुंबईकडे वळविण्यात आली होती. तर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पळस्पे येथून पुणे मार्गे ताम्हिणी घाटाकडून माणगावच्या दिशेने वळविण्यात आली होती

त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले होते. आधीच रखडलेल्या कामामुळे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोकणातील प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यात आता पाण्याचा निचरा होत नसल्याची समस्या निर्माण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाश्यांमधअये प्रचंड नाराजी होती. महामार्गावर पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नसल्याने, मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साठत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कर्नाळा खिंड परिसरातही अशाच प्रकारे पाणी साचत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत.