अलिबाग: होळीच्या सणानिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात रवाना होत असल्याने मुंबई–गोवा महामार्ग वर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावरील कोलाड, इंदापूर, माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. होळी हा कोकणातील प्रमुख सण असल्याने रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईकर चाकरमानी दरवर्षी आपल्या गावी परतत आहेत. यंदा सलग तीन दिवसांची सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच गावाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकही मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. परिणामी महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढत असून माणगाव, इंदापूर, लोणेरे परिसरात वाहतूक मंदावली आहे.

माणगाव बाजारपेठेतही होळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे तासनतास रखडलेली वाहने अशा दुहेरी कोंडीत प्रवासी सापडत आहेत. महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडल्याने या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. काही वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

अलिबाग–मुरुड मार्गावरही कोंडी

रेवस–रेड्डी सागरी मार्गाच्या कामांमुळे अलिबाग–मुरुड मार्ग वरही शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अलिबाग ते आक्षी हे चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक ते दीड तास लागत आहे.

होळी सण आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सकाळी व सायंकाळच्या सत्रात अवजड वाहतुकीवर बंदी घालत आहे. मात्र बंदी आदेश झुगारून काही अवजड वाहने मार्गावर येत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. सकाळपासून मुरुडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.