अलिबाग: सलग तीन दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी दाखल झालेल्या वाहनचालकांचे आणि प्रवाश्यांचे आतोनात हाल झाल्याचे पहायला मिळाले आहे. चौपदरीकरणानंतरही मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही काय आहेत यामागची कारणे याचा थोडक्यात आढावा.

उड्डाण पुलांची कामे रखडली

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले तरी, महामार्गावर उड्डाण पुलाची कामे रखडली आहेत. नागोठणे, कोलाड, चिपळूण, संगमेश्वर येथील महत्वाच्या पूलांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे महामार्गावर या पट्ट्यात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. वाहनांची संख्या वाढल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे.

बाह्यवळण रस्ते अजूनही अपूर्ण

महामार्गावर इंदापूर आणि माणगाव येथे बाह्यवळण रस्ते काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ मध्ये या कामाला सुरूवातही झाली होती. मात्र तत्कालीन ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे हे काम अपुर्णावस्थेत राहीले. आता दुसरा ठेकेदार नेमुन हे काम पूर्ण करण्यास सुरवात झाली आहे. पण कोकण रेल्वेच्या उच्चदाब वाहिन्या या मार्गातून जात असल्याने बाह्यवळण मार्गावरील पूलांचे गर्डर टाकण्याचे काम अपूर्ण राहीले आहे. माणगाव आणि इंदापूर येथील सध्या अस्तित्वात असललेला रस्ता हा मुख्य बाजारपेठेतून जात आहे. त्यामुळे हा मार्ग अरूंद आसल्यामुळे इंदापूर आणि माणगाव पर्यंत वेगाने येणाऱ्या गाड्या या ठिकाणी अडकून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्य़ामुळे वाहतूक कोंडी सुटतांना दिसत नाही.

एसटीच्या बस वाहतूकीचाही परिणाम…

माणगाव आणि इंदापूर येथील बस स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटी बसेस मुळेही महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बस स्थानकात शिरतांना आणि बाहेर पडतांना वाहतुक रोखून धरवी लागते. एसटीची बस पुढे जात नाही तोवर इतर वाहनांना प्रतिक्षा करावी लागते. त्यामळे महामार्गावर वाहतूक कोंडीत भर पडते. तळ कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बहुतांश बसेसना माणगाव येथे थांबा असतो, त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडते.

बेशिस्त वाहनचालक

महामार्गावर वाहतूक कोंडी होण्यामागचे हे देखील महत्वाचे कारण आहे. बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नाहीत. वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लेन मोडली जाते. गोव्याच्या दिशेने जाणारे वाहनचालक आपल्या गाड्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गीकेवरून टाकतात. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बाधित होते. त्यामुळे वाहतुक नियमन करणेही कठीण होऊन बसते. माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूक समस्या होण्यामागचे हे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण ठरते. पोलीस बंदोबस्त लाऊनही वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही.

अवजड वाहतूक

महामार्गावर महाड पर्यंत मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुक सुरू असते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आली तर वाहतूक कोंडी निर्माण होते. मुंबई पूणे दृतगती मार्गावर अवजड वाहने वाढल्यास महामार्ग पोलीस ती निंयत्रित करतात. अवजड वाहने बाजूला करून हलक्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला जातो. अशी कुठलीही व्यवस्था मुंबई गोवा महामार्गावर नाही. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहने मोठ्या संख्येनी रस्त्यावर राहतात आणि वाहतूक कोंडीची समस्या जटील होत जाते.