रत्नागिरी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट आणि संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे पुन्हा एकदा पर्यटकांना मोठा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात निघालेल्या पर्यटकांना रायगडपासून रत्नागिरीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सुट्ट्या, परीक्षांचे निकाल आणि गावाकडे जाणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी उसळली आहे. मात्र, अपूर्ण रस्ते आणि रखडलेले चौपदरीकरण यामुळे ही गर्दी आता डोकेदुखी ठरत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर बाजारपेठ, धामणी, निवळी, हातखंबा, पाली आणि लांजा बाजारपेठ या ठिकाणी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. या महामार्गाचे काम रखडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अपूर्ण रस्त्यांमुळे अपघातांची संख्याही वाढल्याचे चित्र दिसत आहे.

धामणी आणि सोनवी पुलाजवळ सर्वाधिक कोंडी होत असून, ३१ मार्चपूर्वी पूल सुरू करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. निवळी बावनदी, हातखंबा, पाली आणि लांजा येथेही कामे संथ गतीने सुरू असल्याने कोंडीत भर पडत आहे.शुक्रवारी पहाटे ६ वाजल्यापासून संगमेश्वर बाजारपेठेत कोंडी सुरू झाली. दुपारी १ वाजेपर्यंतही परिस्थिती कायम होती. काही ठिकाणी वाहनांच्या २ ते ३ किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

संगमेश्वर–देवरुख मार्गावर बुरंबी करंबेळे दरम्यान जुनाट वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. परिणामी एसटी बससेवा बुरंबी सोनवडे कोंसुब मार्गे वळवण्यात आली. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याने कोंडी अधिकच वाढत आहे. यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाढलेली वाहने आणि अपूर्ण रस्ते यांचा फटका थेट पर्यटकांना बसत असून, कोकण सफर ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये अडकून पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.