अलिबाग– गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. शनिवार आणि रविवारी लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक नियमनासाठी व्यापक उपाययोजना केल्या असल्या तरी वाहनांची संख्या वाढणार असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही ठिकाणे कोणती याचा थोडक्यात आढवा.

पळस्पे फाटा…

मुंबई गोवा महामार्ग आणि जेएनपीटी कडून पुण्याच्या दिशेने जाणारे महामार्ग या ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहतूक मोठ्या संख्येनी यापरिसरात येते या अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक पुण्याच्या दिशेने जात असल्याने पळस्पे फाट्यावर मोठी वाहतुक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पनवेल शहरातून बाहेर पडून पळस्पे फाटा मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकणार आहे.

इंदापूर

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम नव्वद टक्के पुर्ण झाले असले तरी इंदापूर येथील बाह्यवळण मार्गाचे काम अद्याप अपुर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी जुन्या महामार्गाचाच वापर करावा लागतो. हा मार्ग अजुनही रस्ता अरुंद आहे. बाजारपेठेतून हा मार्ग जात असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावतो, एकेरी वाहतूक सुरू ठावावी लागत असल्याने, इंदापूरच्या आधी वाहतूक कोंडी निर्माण होते.

माणगाव

महामार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या याच ठिकाणी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथील बाह्यवळण मार्गाचे काम सध्या रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणीही महामार्गावरील वाहतूक जुन्याच मार्गावरून जाते. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून हा महामार्ग जात असल्याने, या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहनांचा वेग अति मंदावतो, या शिवाय वाकण पाली निजामपूर मार्गे येणारा मार्ग माणगाव येथे बाहेर पडतो. श्रीवर्धन, म्हसळाकडे कडून येणारी जाणारी वाहतूक याच ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाला मिळते. त्यामुळे या परीसरात वाहनांचे क्रॉसिंग मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सातत्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते.

चिपळूण

चिपळूण येथील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणीही वाहतुक कोंडीची शक्यता आहे. महामार्गावरील उड्डाण पुलाच्या कामामुळे येथील वाहतूक सध्या सर्व्हिस मार्गांवरून सुरू आहे. शहरातील वाहतूक तसेच महामार्गावरील वाहतूक एकाच ठिकाणाहून होत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकणार आहे.संगमेश्वर आणि पाली येथील पुलांची कामे पूर्ण झाल्याने, या परिसरात यंदा फारशी वाहतुक कोंडी होणार नाही असा अंदाज यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही ठिकाणे सोडली तर इतर ठिकाणी महामार्गावरून प्रवास करतांना यंदा फारशी अडचण येणार नाही.