अलिबाग : देशात सुपर हायवे उभारण्याच्या घोषणा करणारे आता एका लेनवर आले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करता आलेले नाही. प्रत्येक वेळी काम पूर्ण करण्याची आश्वासने आणि नव्या मुदती दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होत नाही. माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण मार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी ते पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदाही गणेशभक्तांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. किमान माणगाव-इंदापूर परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महामार्गाच्या कामावरून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर टीका केली. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी नवी मुदत दिली जाते. मग कामे पूर्ण का होत नाहीत? गेली दहा वर्षे काय करत होते, असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून दररोज इतक्या किलोमीटर रस्त्यांची निर्मिती होत असल्याचे आणि महामार्गांचे जाळे विस्तारत असल्याचे सांगितले जाते. मात्र मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गांची स्थिती काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत या महामार्गांची अवस्था अत्यंत खराब असल्याची टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे हे सर्व महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आलेले काँक्रीटीकरण दर्जेदार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महामार्ग अत्यंत खडतर असून ५० मीटरचा सलग चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे. नुकतीच कामे पूर्ण झालेली काही पूल महिन्याभरातच बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम ‘स्पेस टेक्नॉलॉजी’चा वापर करून झाल्यासारखे वाटते, अशी उपरोधिक टीप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली.