अलिबाग– मुंबई गोवा महामार्गाचे ९० टक्के काम पुर्ण झाले असल्याचा दावा यंत्रणांकडून केला जात असला तरी, महामार्गावरील पूलांची आणि बाह्यवळण मार्गांच्या कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे यंदाही गणेशभक्त्यांच्या कोकणतील वाटेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरवात झाली होती. तर इंदापूर ते झाराप दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील काम हे २०१४ मध्ये सुरु झाले होते. ही दोन्ही कामे दोन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भुसंपादनातील अडसर, पर्यावरण विषयक मंजूऱ्या, ठेकेदारांची निष्क्रीयता या आणि इतर कारणांमुळे हे काम रखडत गेले. २०२६ च्या उत्तरार्ध सुरू झाला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळुण येथील उड्डाण पुलाचे कामही अपूर्ण आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतूकीसाठी बंद आहे. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी पुलाच्या संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच या पुलावरील वाहतूक सुरू करायची अथवा नाही याचा निर्णय़ घेतला जाणार आहे.
इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गांची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोकण रेल्वेने तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यास नकार दिल्याने, हे काम आता पूर्ण होणार नाही. त्यामुळे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना इंदापूर आणि माणगाव दरम्यान वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, चिपळूण मधील उड्डाण पुलाचे कामही रखडल्याने या ठिकाणीही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघण्यास सुरवात होणार आहे. गणेशभक्तांसाठी एसटीच्या दिड हजारहून अधिका विशेष बसेस सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी नागोठणे, माणगाव, इंदापूर आणि चिपळूण परिसरात रखडलेल्या कामांमुळे गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे.
माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण मार्गाची किमान एक मार्गिका सुरू होणे अपेक्षित होते. पण ते झालेले नाही. त्यामुळे माणगाव ते इंदापूर दरम्यान यंदाही मोठी वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता आहे. – प्रविण पाटील, वाहन चालक
