रत्नागिरी : नैसर्गिक वायुगळतीमुळे विस्कळीत झालेली मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक शनिवारी पूर्ववत सुरू झाली. लांजा तालुक्यातील आंजणारी येथे पुलावरून घरगुती नैसर्गिक वायूची वाहतूक करणारा टॅंकर गेल्या गुरुवारी नदीमध्ये कोसळून अपघात झाला. टॅंकरच्या टाकीतून वायुगळती झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या टप्प्यातील महामार्गावरील वाहतूक गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून बंद करण्यात आली. अपघातग्रस्त टॅंकरमधील नैसर्गिक वायू दुसऱ्या टॅंकरमध्ये काढून घेतल्यावर शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्रीनंतर २ वाजण्याच्या सुमारास येथून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. दरम्यानच्या काळात लांजा-देवधे-पुनस-काजरघाटीमार्गे वाहतूक वळवण्यात आली होती.

 टॅंकरच्या टाकीमधून सुमारे १२ टन नैसर्गिक वायू काढण्यात आला, तर ६ टन वायूची गळती झाली आहे. अपघातग्रस्त टॅंकरच्या टाकीमध्ये अजूनही थोडा वायू शिल्लक आहे. टॅंकर नदीतून बाहेर काढून या वायूची गळती रोखण्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञांचा चमू काम करत आहे.