Mumbai gas leak death : मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात रविवारी पहाटे एका सार्वजनिक शौचालयातून आलेल्या तीव्र रासायनिक वासामुळे गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राम मंदिर (पूर्व) येथील मृणालताई पुलाजवळ असलेल्या पारशी पंचायत गेटपाशी घडली. पालिकेने या मृत तरुणांची ओळख प्रभाकर धनीवार (२४) आणि भावीन देसाई (१८) अशी पटवली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे डॉक्टरांनी पहाटे ३.४९ वाजता त्यांना मृत घोषित केले.

रासायनिक दुर्गंधी वायू आल्याने मृत्यू

सार्वजनिक शौचालयातून तीव्र रासायनिक दुर्गंधी येत असल्याचं आणि त्यामुळे दोन जण गुदमरल्याचं स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला याची माहिती दिली. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ते शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

“प्राथमिकदृष्ट्या, शौचालयाजवळ असलेल्या एका लहान कारखान्यातून बाहेर पडलेला वायू या दोन व्यक्तींच्या संपर्कात आल्याचं दिसून येत आहे”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या मृत्यूप्रकरणी पीडितांच्या कुटुंबियांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. “ते दोघेही आम्हाला स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यांचे ओठ काळे पडले होते आणि तोंडाला फेस आला होता”, अशी माहिती प्रभाकर धनीवार यांचे भाऊ प्रभात धनीवार यांनी दिली.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास प्रशासनापर्यंत पोहोचली. त्यानंतर तात्काळ अग्निशामक दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि पालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. हे पथक शौचालय परिसराची तपासणी करून या रासायनिक वासाचा मुख्य स्त्रोत शोधून काढणार आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतरच घटनेचा नेमका क्रम आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान,याप्रकरणी मुंबई महानगपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “गोरेगावात झालेल्या दोन मृत्यूंप्रकरणी चौकशी सुरू आहे. रासायनिक द्रव्यांमुळे हे मृत्यू झाले का याची तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती कशी होती, त्यांनी काही प्राशन केलं होतं का? याचा तपास केला जाईल.”