Bandra Western Railway Encroachment Demolition Drive: मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे परिसरातील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचे आदेश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पाच दिवस चालणाऱ्या अतिक्रमणविरोधी कारवाईला वांद्रे येथील गरीब नगरमध्ये पालिकेच्या मदतीने सुरुवात झाली आहे. १९ ते २३ मे या काळात ही कारवाई चालणार आहे. अतिक्रमण हटविताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा, रेल्वेचे सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात
मुंबई उच्च न्यायालयाने ०५ मे रोजी अतिक्रमण हटविण्याचे आदेश पश्चिम रेल्वेला दिल्यानंतर ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, २०२१ रोजीच्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडट्टीधारकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. रेल्वेच्या जमिनीत अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पोलिस फौजफाटा तैनात
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस आणि जीआरपीचे ४०० जवान अतिक्रमण सुरु असलेल्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. यासह अग्निबंब, रुग्णवाहीका आणि मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्यांनी या कारवाईबद्दल पोलिस आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. वांद्रे टर्मिनस परिसरातील बांगलादेशी नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार मानले. सोमय्यांनी स्वत: या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
कोर्टाचे आदेश
यापूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु केल्यानंतर गरीब नगर रहीवासी वेलफेअर संघाच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत नमूद काही बांधकामं, घरं न पाडण्यास मज्जाव केला असताना ती पाडण्यात आल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
तसेच, काही कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. दरम्यान, ०५ मे रोजीच्या कोर्टाच्या आदेशात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आले. पण, २०२१ च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्यांना यातून संरक्षण देण्याची सूचनाही करण्यात आली.
