Mumbai Navy Sailor Found Dead Update : मुंबईतील नेव्ही नगर येथील निवासस्थानी १५ ऑगस्ट रोजी एक नौदल सैनिक, त्यांची पत्नी आणि त्यांची दोन मुले मृतावस्थेत आढळून आली आहेत. या घटनेमुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नौदल सैनिकाने स्वतःचे जीवन संपवल्याचा संशय आहे. दोन्ही मुलांचे मृतदेहही घराच्या आतच आढळून आले. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, मुलांच्या मृत्यूचं संभाव्य कारण अद्याप निश्चित झालेलं नाही. शवविच्छेदन (पोस्ट-मॉर्टम) आणि फॉरेन्सिक तपासणीचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्व संभाव्य मार्गांनी चौकशी केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमागील नेमका घटनाक्रम काय होता, हे शोधण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. ही दुर्दैवी परिस्थिती कशामुळे ओढवली, याचा तपास अद्याप सुरू आहे.
विषबाधेमुळे मुलांचा मृत्यू
“नाविकाचा मृत्यू फाशी घेतल्याने आणि त्याच्या पत्नी व मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे”, असं दक्षिण मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं. हे मृत्यू एकमेकांशी जोडलेले आहेत का, तसंच या घटनेमागील परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील निष्कर्ष प्राथमिक असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक (न्यायवैद्यकीय) तपासणीनंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय नौदलाने काय म्हटलंय?
अधिक तपशीलांची प्रतीक्षा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय नौदलाचा एक सैनिक, त्याची पत्नी आणि २ मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भारतीय नौदल या तपासात सर्व शक्य ते सहकार्य करत आहे.”
