राहाता: भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावामुळे स्थगित ठेवलेले आयपीएलचे सामने पुन्हा एकदा उद्या, शनिवारपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने पत्नी देविशा शेट्टीसह आज, शुक्रवारी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
नंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘मी आज साईबाबांना काही मागण्यासाठी आलेलो नाही. तर साईबाबांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. पुन्हा एकदा आयपीएल सुरू होत आहेत असे सांगताना सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता.
दर्शनानंतर संस्थानचे जयराम कांदळकर यांनी त्यांचा शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार केला.आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी, मागील महिन्यांत मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी व स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले होते. आयपीएलचे उर्वरित सामने उद्यापासून सुरू होणार आहेत. मुंबईचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.