KEM Hospital History & Name Change Controversy: मुंबईत १०० वर्षांपासून रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या ‘किंग एडवर्ड स्मारक’ रुग्णालय अर्थात ‘के.ई.एम’ रुग्णालयाचे नाव बदलण्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण केईएममध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. २२ जानेवारी १९२६ रोजी ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या या रुग्णालयाच्या नावावरून सध्या भाजपा आणि शिवसेना (ठाकरे) आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान किंग एडवर्ड यांच्या नावाने मुंबई महानगरपालिकेचे पहिले रुग्णालय कसे उभे राहिले? तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयाला ‘सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय’ हे नाव का दिले गेले? याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

रुग्णालयाची स्थापना कशी झाली?

भारतात आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याची सुरुवात ब्रिटिश काळात झाली. १८४५ साली मुंबईत पहिल्या ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भारतीयांना पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी यामुळे मिळाली. ज्याचे नामकरण पुढे सर जे. जे. रुग्णालय असे झाले. मात्र वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भारतीय डॉक्टरांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खदखद व्यक्त होऊ लागली. आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रशिक्षित भारतीय तज्ज्ञाना या संस्थेत मानाचे पद मिळत नव्हते. त्यामुळे भारतीयांसाठी वेगळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असावे, असा विचार प्रकर्षाने पुढे आला.

लंडन विद्यापीठातून एमडी पदवी मिळवणारे डॉ. के. एन. बहादूरजी हे पहिले भारतीय होते. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना मेडिसिनच्या प्राध्यापक पदासाठी नकार देण्यात आला. इथूनच मुंबई मनपाचे स्वतःचे रुग्णालय असावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रवादी नागरिक आणि काही डॉक्टरांनी एकत्र येत नव्या वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या डॉक्टरांचे नेतृत्व डॉ. के. एन. बहादूरजी यांच्याकडे आले. या कल्पनेला फिरोजशहा मेहता यांनीही पाठिंबा दिला. दुर्दैवाने ही कल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच १५ ऑगस्ट १८९८ रोजी त्यांचे निधन झाले.

kem hospital history old photo
के.ई.एम रुग्णालयाचे जुने छायाचित्र. (Photo – KEM Hospital)

पुढे १९०७ मध्ये पोलीस चार्जेस कायद्यानुसार, मुंबई शहरातील वैद्यकीय सेवांचा समावेश मुंबई महानगरपालिकेअंतर्गत करण्यात आला. १९०९ साली महानगरपालिकेच्या समितीने रुग्णालय आणि त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव मंजुर केला. मुंबईतील कापड व्यावसायिक गोर्धनदास सुंदरदास यांनी रुग्णालयासाठी मोठा निधी दिला. तर ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी रुग्णालय आणि त्याच्याशी संलग्न असलेली गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही इमारतींची रचना केली. विशेष म्हणजे याच विटेट यांनीच गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालयाची रचना केली होती. डॉक्टर जीवराज मेहता यांनी रुग्णालयाचे पहिले डीन बनले. डॉ. मेहता यांनीच महाविद्यालय आणि रुग्णालयाची इमारत एकाच छत्राखाली असावी, अशी कल्पना मांडली. जेणेकरून मुसळधार पावसातही कर्मचारी आणि डॉक्टरांना दोन्ही इमारतीमध्ये ये-जा करणे सोपे होईल.

रुग्णालयाच्या बांधकामासाठी त्याकाळी २५ लाख २७ हजार ६९९ तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी १३ लाख ६४ हजार ५७४ रुपये इतका खर्च आला होता.

के.ई.एम रुग्णालयाचे माजी न्यूरोसर्जरी विभागाचे विभागप्रमुख सुनील के. पांड्या यांनी के.ई.एम. रुग्णालयाच्या स्थापनेचा इतिहासासंबंधी लेख लिहिला आहे. रुग्णालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लेखातून ही माहिती घेण्यात आली आहे.

केईएम रुग्णालयाच्या नावाचा इतिहास काय?

भारतीय डॉक्टरांच्या स्वाभिमानातून तयार झालेल्या या रुग्णालयाला ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव का देण्यात आले? असा प्रश्न यावेळी पडू शकतो. किंग एडवर्ड सातवे यांच्या नावावरून ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ असे या रुग्णालयाला नाव देण्यात आले होते. किंग एडवर्ड सातवे यांचे १९१० रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ एखादी वास्तू उभारावी यासाठी मुंबईत साडे पाच लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. तेव्हाच्या मुंबई सरकारने परळमध्ये ५० हजार चौरस यार्ड जमीन रुग्णालयाच्या उभारणीसाठी दान केली.

प्रसिद्ध कापड व्यापारी गोर्धनदास सुंदरदास आणि किंग एडवर्ड स्मारकासाठी जमा झालेला निधी वापरून केईएम रुग्णालयाची निर्मिती झाली होती. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला गोर्धनदास सुंदरदास आणि रुग्णालयाला किंग एडवर्ड सातवे यांचे नाव देण्यात आले.

केईएमच्या स्थापनेनंतर १०० वर्षांपूर्वी हे
रुग्णालय सुमारे १२५ खाटांचे होते. मात्र शतकभरात याचा आकार प्रचंड वाढला. आज रुग्णालयात १८०० खाटा असून ३९० फिजिशियन आणि ५५० निवासी डॉक्टर इथे काम करतात. दरवर्षी १८ लाख बाह्यरुग्णांवर आणि ८५ हजार आंतररुग्णांवर उपचार केले जातात.

सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात विविध शाखांमध्ये मिळून २००० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. एक नर्सिंग स्कूलदेखील संस्थेमार्फत चालवले जाते.

नामांतराचा वाद काय आहे?

भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य समितीकडे पत्र पाठवले. यानंतर आठवड्याभरातच आरोग्य समितीच्या बैठकीत पत्राला मंजुरी देण्यात आली. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नामांतराचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांची संघटना मार्ड आणि शिवसेनेने (ठाकरे) या निर्णयाला विरोध केला आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी कोणते नाव प्रस्तावित केले?

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करावे, अशी अधिकृत शिफारस महापालिकेकडे केली आहे. या नावाचे संक्षिप्त रुप ‘केईएम’ असे होते. त्यामुळे रुग्णालयाची जुनी ओळख आणि संक्षिप्त नाव तांत्रिकदृष्ट्या कायम राहील, असा दावाही या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

मनसेकडूनही झाली होती नामांतराची मागणी

के.ई.एम रुग्णालयाचे नामांतर करण्यात यावे, ही मागणी नवी नाही. यापूर्वी मनसेनेही अशा प्रकारची मागणी केली होती. आनंदीबाई जोशी यांच्या १५३ व्या जयंतीच्या निमित्ताने २०१८ साली मनसेकडून रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन सात दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याला सलाम आहेच. पण आता मानिसक गुलामगिरीतून मुक्त होण्याची वेळ आली आहे. अठराव्या शतकात आनंदीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून केईएम रुग्णालयाला ‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय’ असे नाव द्यावे, अशी मागणी मनसेने पत्राद्वारे मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली होती.