मुंबई : मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी, शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारकडून ‘लेक लाडकी योजना’ राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ६७१ आणि मुंबई उपनगरातील दोन हजार ८९२ अशा एकूण तीन हजार ५६३ मुलींना लाभ मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजनेत सुधारणा करून राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलींच्या जन्मानंतरच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी वा तद्नंतर जन्मलेल्या मुलींकरिता लागू आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा अधिक नसावे ही अट घालण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील मुलींना शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी या योजनेतून टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये, इयत्ता सहावीत प्रवेशानंतर सात हजार रुपये आणि इयत्ता अकरावीत प्रवेशानंतर आठ हजार रुपये दिले जातात.

मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ७५ हजार रुपयांचा अंतिम लाभ देण्यात येतो. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अंतिम लाभ मिळण्यासाठी मुलीने १८ वर्षे पूर्ण केलेली आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत.