Mumbai Living Cost Debate and Viral Budget Breakdown: स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत राहण्यासाठी दर महिन्याला किती पगार पाहिजे? कितीही पगार असला तरीही मुंबईत राहणं प्रत्येकाला परवडत नाही. अगदी तुटपुंज्या पगारातही अनेक कुटुंब इथं सुख-समाधानाने राहतात, तर काहीजण लाखो रुपये महिना कमावूनही त्यांना मुंबई महाग वाटते. मुंबईत राहणाऱ्या एका जोडप्यानेही असाच अनुभव शेअर केला आहे. हे जोडपं महिन्याला २.२ लाख रुपये कमावतात. तरीही त्यांना मुंबई राहण्यासाठी खूप महाग वाटत आहे. त्यांच्या २.२ लाख रुपयांपैकी किती रुपये कुठे खर्च होतात, याचा पूर्ण तपशीलच त्यांनी शेअर केला आहे.

रेडिटवर एका जोडप्याने त्यांचा मासिक खर्च शेअर केलाय. युजरने म्हटलंय की, मी आणि माझी जोडीदार आम्ही मिळवून २.२ लाख रुपये महिन्याला कमावतो. आम्ही १ बीएचके फ्लॅटमध्ये राहत असून आम्ही आमच्या कुटुंबापासून लांब आहोत. तसंच, आम्ही महिन्याला क्वचितच बचत करत असू.

महिन्याचे २.२ लाख रुपये कुठे खर्च होतात?

असं म्हणत त्याने त्याच्या खर्चाचा तपशील दिलाय. त्यात त्याने म्हटलंय की, “मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याचा दर महिन्याचा खर्च ४४ हजार आहे. म्हणजेच, ते दर महिन्याला ४४ हजार रुपये घरभाडं भरतात; ५ ते ६ हजार रुपये ऑफिसच्या प्रवासाचा खर्च; ५ ते ६ हजार वीजबिल; ८ हजार रुपये मदतनीस (Maid); २० हजार रुपयांचं घरातील वाणसामान; ६० हजार रुपयांची एसआयपी (तिचे ५० हजार आणि याचे १० हजार); ५ हजार रुपये औषधोपचार; तर १२ ते १३ हजार रुपये ऑफिस पार्टीसाठी खर्च होतात.”

पगारातले ६० हजार रुपये उरले तरीही महिना अखेर खिसा रिकामाची

त्याने पुढे म्हटलंय, “या खर्चांनंतरही आमच्याकडे अधिक बचतीसाठी अंदाजे ६० हजार असायला हवेत. पण महिना संपत आला की आमच्याकडे सतत पैसे शिल्लक राहत नाहीत. काही दिवस माझ्यासाठी कपडे, तर काही दिवस तिच्यासाठी, मग एखादं घड्याळ, कधीतरी एखादा परफ्यूम (खरेदी करण्यात पैसे जातात.) पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आमच्या गावी एकाच फेरीत जाण्यासाठी लागणारे ४५ हजार खर्च होऊन जातात! (आम्ही ट्रेनच्या तिकिटांसाठी प्रयत्न करतो, पण माझ्या कामामुळे माझ्या सुट्टीचं वेळापत्रक अगदी शेवटच्या क्षणी, जेमतेम एक दिवस आधी ठरतं.) त्यात भर म्हणजे, हा तर प्रवासाचा मूलभूत खर्च आहे.”

“अरे, लोक कसे जगत आहेत? आपण पैसे कसे वाचवायचे? सध्या हे ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला मुलं होतील तेव्हा काय? जर SIP बंद झाली, तर भविष्यात आपली खूप मोठी अडचण होईल”, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.

ही पोस्ट व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्सनी लगेचच निदर्शनास आणून दिले की SIP मधील गुंतवणूक ही अखेर बचतच आहे. जर या गुंतवणुकीसाठी पैसे मोजल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करताना अडचण येत असेल, तर SIP ची रक्कम कमी करण्याची हीच वेळ आहे. “जर तुम्ही उर्वरित ६० हजार रुपयांचा हिशोब ठेवू शकत नसाल, तर काय कमी करावे हे सांगणे फार कठीण आहे. जर तुम्ही दर प्रत्येक महिन्यात महागडी घड्याळे आणि परफ्यूमवर खर्च करत असाल, तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही,” असे एका युजरने म्हटले. तर दुसऱ्याने म्हटलंय की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, ही खर्चाची समस्या वाटते. मित्रा, SIP चा मोठा हिस्सा तुझी बचतच आहे. जर तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा व्यवस्थापित करू शकत नसाल तर SIP कमी करा.”

तिसऱ्याने टिप्पणी केली, “थेट खर्चाची समस्या. तुमच्यासाठी योग्य शब्द ‘अर्बन पुअर’ (शहरी गरीब) हा आहे. ऑफिस पार्ट्यांवर १५ हजार रुपये खर्च करण्याचे हे काय बंधन आहे? मूर्खपणा आहे. हे बंद करा. महागडे ड्रिंक्स किंवा जेवण ऑर्डर करू नका. बजेटमध्ये राहा. घरखर्च म्हणून २८,००० रुपये देखील खूप जास्त आहेत. यात सहज १०,००० रुपयांची कपात करा.”