Dadar Railway Station GRP Woman Constable Saves Man : दादर रेल्वे स्थानकावर एका २८ वर्षीय व्यक्तीने धावत्या लोकल ट्रेनखाली डोकं ठेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासकीय रेल्वे पोलिसांच्या एका सतर्क महिला हेड कॉन्स्टेबलच्या समयसुचकतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. गुरुवारी रात्री घडलेली ही थरारक सुटका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटत असताना अवघ्या काही सेकंदात हा थरार घडला.

धावत्या ट्रेनखाली आत्महत्येचा प्रयत्न

३० जुलै रोजी रात्री १० वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली. हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे या सहाय्यक उपनिरीक्षक पठाण व चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रुपनवर आणि पोलीस कॉन्स्टेबल टपोळे यांच्यासोबत रात्रीच्या गस्तीवर होत्या. त्याचवेळी प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने जाणारी एक धीम्या गतीची लोकल रेल्वे स्थानकावरून सुटू लागली. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने अचानक प्लॅटफॉर्मवर झोपून धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डखाली स्वतःचं डोकं ठेवलं आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच अनिता नरवडे यांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली, त्याचे पाय पकडले आणि त्याला धावत्या ट्रेनपासून वेळेत दूर खेचलं.

“हेड कॉन्स्टेबल नरवडे यांनी अत्यंत तत्परतेने काम करत त्या व्यक्तीला सुरक्षित बाजूला ओढलं, यामुळे एक मोठा जीवघेणा अपघात टळला”, असं मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांनी सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचं समोर आलं आहे. तो विवाहित असून, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता आणि सध्या नातेवाईकांकडे राहत होता. मात्र, त्याने पोलिसांना आपली ओळख किंवा पत्ता सांगण्यास नकार दिला आहे.

घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “तो पुन्हा असं टोकाचं पाऊल उचलणार नाही यासाठी त्याचं समुपदेशन केलं जाईल. तसंच आम्ही त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवणार आहोत”, असं एका वरिष्ठ जीआरपी अधिकाऱ्याने सांगितलं. सध्या त्या व्यक्तीची ओळख पटवणे, त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेणं आणि त्याला योग्य समुपदेशन देणं यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.