Mumbai LPG Shortage and Black Market Price Crisis : पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही युद्धसदृष्य परिस्थिती थेट सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करत आहे. देशात नैसर्गिक वायूचा कोणताही तुटवडा नाही, असं केंद्र सरकारने जाहीर केलं असलं तरीही शहरी भागात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांत गॅसटंचाईचे चटके बसत असून सिलिंडर वितरणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. दुसरीकडे, गॅसअभावी छोटी उपाहारगृहे, खाणावळी बंद पडू लागल्याने त्यावर अवलंबून असलेल्या विद्यार्थी आणि श्रमिकवर्गाने गावाकडची वाट धरली आहे.
सिलिंडर रिफिल करण्यासाठी मुंबईत रांगा
कांदिवलीतील आकुर्ली रोडवर दुपारच्या कडक उन्हात नागरिक रिकामी एलपीजी सिलिंडर घेऊन रिफिल करण्यासाठी रांगेत उभे होते. परंतु, रिफिल करण्यासाठी कोणतेही वाहन आले नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गॅस सिलिंडरचा सोन्याचा भाव मिळाला आहे. तसंच, सिलिंडरचा काळाबाजारही सुरू झाला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.
एकच सिलिंडर असलेल्या कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सामान्य नागरिक ऑफिसमध्ये रजा टाकून सिलिंडर भरण्याच्या रांगेत उभे राहिले आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवलीपासून पूर्व उपनगरातील धारावी आणि भांडुपपर्यंत रांगा दिसून आल्या. मुंबईच्या मोठ्या भागात गृहनिर्माण संस्था आणि निवासी संकुलांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) मिळतो, तर जुन्या गृहनिर्माण संस्था आणि निम्न सामाजिक-आर्थिक क्षेत्रे एलपीजी पुरवठादारांवर आहेत.
वडापावने लहान मुलांचं पोट भरत नाही
कांदिवलीतील लोखंडवाला टाउनशिपमधील आकुर्ली रोड येथील रहिवासी अस्वस्थ होत आहेत. निवृत्त झालेले सुरेश सावंत एलपीजी सिलिंडर रिफिल करण्याच्या रांगेत उभे होते. ते म्हणाले, “माझे नातवंडे उपाशी राहू शकत नाहीत”. मोठी माणसं वडा पाव खाऊन राहू शकतात पण वडापावने लहान मुलांचं पोट भरत नाही.” हिंदूस्तान टाइम्सने त्यांच्या वृत्तात असं म्हटलं आहे.
“मालाडमधील मालवणी येथील झोपडपट्टी वसाहतीत, ४४ वर्षीय हुमाले यादवर यांनी जवळजवळ एक महिना आधी एलपीजी सिलिंडर बुक केला होता. गुरुवारी, यादवर त्यांच्या मुलींसह एलपीजी डीलरच्या ऑफिसबाहेर जवळजवळ एक तास वाट पाहत होते आणि नंतर त्यांना एक सिलिंडर मिळाला. “इतके आगाऊ बुकिंग केल्यानंतर जर ही परिस्थिती असेल, तर परिस्थिती किती वाईट असेल याची कल्पना करा”, असंही ते म्हणाले.
दरम्यान, काळ्याबाजारात एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दुप्पटीने वाढली आहे. तब्बल १८०० रुपयांना सिलिंडर विकत घ्यावा लागत आहे. “लोकांना सिलिंडर बुक करणे देखील कठीण जात आहे. कधीकधी सिलिंडर डिलिव्हर झाल्याचे दाखवले जाते, परंतु सिलिंडर आलेला नसतो”, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
