गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरांमध्ये ११ ऑगस्टपासून वाढ होणार आहे. मुंबईसह राज्यभरात दुधाचे दर वाढणार आहेत. दूध उत्पादक संघ आणि प्रोसेसर्स वेलफअर असोशिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत खासगी दूध डेअरींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यामध्ये गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या प्रति लिटर दरांत वाढ करण्याच्या निर्णयावर एकमत झालं.

किती रुपयांनी महाग होणार दूध?

गायीचं आणि म्हशीचं दूध हे प्रति लिटर दोन रुपयांनी महाग होणार आहे. दूध हाताळणी आणि जतन करण्याचा खर्च वाढला आहे. तसंच इंधनाच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएशनच्या माहितीनुसार डिझेलच्या किंमती या मागील दोन महिन्यांत प्रति लिटर १० रुपयांनी वाढल्या आहेत. तसंच दुधाच्या पॅकेजिंगचा खर्चही ३० टक्के इतका जास्त झाला आहे. तसंच दूध जतन करण्याच्या प्रक्रियेचा खर्चही वाढला आहे त्यामुळे गायीचं आणि म्हशीचं दूध प्रति लिटर दोन रुपयांनी महाग होणार आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

डेअरी उत्पादनंही महाग होण्याची शक्यता

डेअरी क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, हा निर्णय उद्योगाची वाढती इनपुट कॉस्ट ग्राहकांवर टाकण्याची गरज दर्शवतो. डेअरी व्यवसायात नफ्याचे प्रमाण साधारणपणे कमी असते, त्यामुळे कच्च्या मालाच्या किंवा ऊर्जा खर्चातील चढ-उतारामुळे नफा कमी होऊ शकतो, जर किंमतीत बदल केले नाहीत तर. किंमती वाढवून कंपन्या महागाईच्या दबावापासून स्वतःचा नफा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अत्यावश्यक अन्नपदार्थांमध्ये वारंवार किंमत वाढ झाल्यास त्याचे काही धोके देखील आहेत. डेअरी उत्पादने ही रोजच्या घरगुती खर्चाचा भाग असल्याने, किंमतीत सतत वाढ झाल्यास ग्राहकांची मागणी कमी होऊ शकते. जर ग्राहक किंमतीबाबत जास्त संवेदनशील राहिले, तर संघटित डेअरी कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. याव्यतिरिक्त, दूध ग्राहक किंमत निर्देशांकाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, या किंमतीतील बदलांमुळे अर्थव्यवस्थेतील महागाई वाढण्यास हातभार लागेल.

आगामी काळात दर आणखी वाढण्याचीही शक्यता

दूध वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दुधाच्या किंमतीवर परिणाम दिसून आला आहे. दुधाची किंमत २ रुपये प्रति लिटरने वाढली आहे तर दही, ताक तसेच पनीरसारख्या इतर अनेक दुगजन्य पदार्थांच्या किंमतीमध्ये १० टक्के वाढ दिसून येणार आहे. माल वाहतुकीच्या वाढत्या खर्चासह पॅकेजिंगचा खर्चही ३० टक्क्यांनी महागले असल्याचे सांगण्यात येत आहे. दूध खरेदीचा खर्च वाढला आहे. त्याचसह दूध खरेदी करण्याच्या खर्चामध्ये भविष्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता मिल्क प्रोड्युसर अँड प्रोसेसर वेल्फेअर असोसिएशनने वर्तवली आहे.