Mumbai Mayor Husband Fake YouTube Video : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चुकीची माहिती देणाऱ्या अज्ञाताविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

लालबाग येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय राजेश वासुदेव तावडे यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार दिली आहे. ते कणकवली येथे फोटोग्राफीचे वर्ग आणि एक स्टुडिओ चालवतात. त्यांचं एक युट्युब चॅनेल आणि फेसबुक अकाउंट देखील आहे. यावर ते त्यांच्या फोटोग्राफी क्लासच्या जाहिराती आणि फोटो पोस्ट करत असतात. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने त्यांना व्हॉट्सॲपवर एक युट्युब शॉर्ट्सची लिंक पाठवली. त्यांनी ती लिंक उघडली असता, त्यांना ‘gk-shorts-videos’ नावाच्या चॅनेलवर एक छोटा व्हिडिओ आढळला. या व्हिडिओचं शीर्षक ‘Ritu Tawade ke pati Rajesh Tawade ka jeevan parichay’ (रितू तावडे यांचे पती राजेश तावडे यांचा जीवन परिचय) असं होतं.

२३ ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तक्रारदा cqर म्हणजेच राजेश तावडे यांचा फोटो महापौर रितू तावडे यांच्या फोटोशेजारी लावून, त्यांचा उल्लेख महापौरांचे पती म्हणून करण्यात आला होता. तक्रारदाराला संशय आहे की, त्यांचा फोटो त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून घेण्यात आला असावा, तर महापौरांचा फोटो सोशल मीडियावरून मिळवला असावा. प्राथमिक माहिती अहवालात (FIR) नमूद केल्यानुसार, तक्रारदाराने संबंधित युट्युब चॅनेल तपासले असता ते १५ एप्रिल रोजी तयार करण्यात आल्याचे समोर आले. या चॅनेलचे सुमारे १,५३० सब्सक्राइबर्स असून त्यावर राजकीय नेते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या परिचयाचे २४३ व्हिडिओ आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, “हा चॅनल निर्माता राजकीय नेत्यांच्या जीवनाबद्दल माहिती देणारे व्हिडिओ तयार करतो, असं तक्रारदाराने नमूद केलं आहे.” कोणतीही शहानिशा न करता आपली आणि महापौरांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “आम्ही याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास करत आहोत”, असं पोलिसांनी सांगितलं.