तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरून महापौर किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न; म्हणाल्या, “तिसरी लाट..”

करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या. हे वक्तव्य त्यांनी माघारी घेतलंय.

Mayor-Corona
तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरून महापौर किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या. मात्र, आता त्यांनी हे विधान मागे घेत करोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे, असं म्हटलंय. “मी मुंबईत करोनाची तिसरी लाट आली आहे, असं म्हटलं नव्हतं. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते, की नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या की, करोनाची तिसरी लाट येणार नसून ती आधीच आली आहे. नागपुरात तर तिसरी लाट आल्याचं मंत्री राऊतांनी म्हटलंय. यानंतर त्यांच्या कार्यालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढून पेडणेकर यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. तिसरी लाट मुंबईच्या वेशीवर असून पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता, ते थांबवणे आपल्या हातात आहे,” असं महापौर पेडणेकर म्हणाल्याचं म्हटलंय.

मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, “करोना अजून संपलेला नाही, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्याकडे अद्याप १२ ते १८ या वयोगटासाठी करोनाची लस उपलब्ध नाही. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा लहान मुलांना फटका बसलाय. मुंबई आणि महाराष्ट्रात तिसरी लाट टाळण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आपण सर्वांनी करोना नियमांचे पालन केल्यास तिसरी लाट थांबवता येऊ शकते.”

दरम्यान, मुंबईत करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता गेल्या आठवड्यात काही सूचना करण्यात आल्या आहेत. एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे. सील केलेल्या इमारतीच्या गेटवर पोलीसही तैनात केले जाणार आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचं ठरवण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai mayor u turn on corona third wave remark says it is on doorsteps hrc