Mumbai Metro vs New York Subway trending travel experience : मुंबईतील मेट्र प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारा आहे, असं मुंबईबाहेरून येणारा प्रत्येकजण म्हणतो. मुंबईसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतर कोणत्याही शहरात सहज सापडत नाही. मुंबईतील बेस्ट उपक्रम असो, लोकल सेवा असो वा मेट्रो सेवा असो; या सर्व वाहतूक व्यवस्थेमुळे मुंबईतील प्रवास किफायतशीर आणि सुलभ होतो. मुंबईतील याच सार्वजनिक व्यवस्थेचं आता चक्क अमेरिकेतली महिलेने कौतुक केलंय. एवढंच नव्हे तर तिने अमेरिकेने भारताकडून सार्वजनिक व्यवस्थेचे धडे घ्यावेत असंही म्हटलंय.
एका अमेरिकन महिलेने मुंबई मेट्रोमधून पहिल्यांदा प्रवास केल्याचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. न्यूयॉर्कमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी तुलना करताना तिने मुंबई मेट्रोची स्वच्छता, सुरक्षा आणि किफायतशीरपणाचे कौतुक केले असून, तिच्या या व्हिडिओने इंटरनेटवर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ ‘spicygori’ या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जे लिझ (Liz) आणि शिव (Shiv) चालवतात.
या क्लिपमध्ये, लिझने तिच्या मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रवासाचे चित्रीकरण केले असून प्रवासाच्या विविध टप्प्यांवर तिची मते मांडली आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला लिझने सांगितलं की ती मुंबईत आहे आणि पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास करत आहे. तिकीट खरेदी करताना, एका तिकिटाची किंमत फक्त २० रुपये असल्याचं सांगत ही सेवा खूपच परवडणारी असल्याचा उल्लेख तिने केला.
स्टेशनची स्वच्छता व सुरक्षा
स्टेशनवरून जाताना तिने परिसर खूप स्वच्छ असल्याचंही सांगितलं. तसंच, प्लॅटफॉर्मवरील सरकते दरवाजे तिला खूप आवडले, कारण यामुळे तिथली सुरक्षा अधिक मजबूत वाटते असं ती म्हणाली.
न्यूयॉर्क मेट्रोशी तुलना
ट्रेनमध्ये चढल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, ही ट्रेन न्यूयॉर्कमधील मेट्रोपेक्षा खूपच जास्त स्वच्छ आहे. मुंबईत प्रचंड उष्णता असल्याने मेट्रोमधील थंडगार वातानुकूलित (AC) वातावरण खूपच छान वाटल्याचं तिने आवर्जून सांगितलं. तसंच, प्रवासादरम्यान लिझने मुंबई मेट्रोमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबा असल्याचं दाखवलं. अशी सुविधा तिने इतर देशांमध्ये पाहिली नसल्याचंही तिनं नमूद केलं. व्हिडिओच्या शेवटी, तिने मुंबई मेट्रोचं वर्णन ‘उत्कृष्ट’ असं केलं आणि अमेरिकेने भारताकडून शिकण्याची गरज असल्याचंही म्हटलं.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबई मेट्रोची न्यूयॉर्कच्या वाहतूक व्यवस्थेशी केलेली ही सकारात्मक तुलना अनेकांना आवडली आहे.एका युझरने कमेंट केली, “फायनली, कोणीतरी हे बोललं.” तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, “आमची मुंबईत तुमचे स्वागत आहे.”
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भातील पोस्ट रिट्वीट केली आहे.
