Mumbai migrant workers leaving city amid LPG supply shortage crisis : पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळते आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेले युद्ध संपण्याचे चिन्हे नाहीत. परिणामी जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही निर्बंध आल्याने देशात येणारा एलपीजीचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतोय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशभरातील कामगार रोजीरोटीसाठी येतात. मात्र, आता जेवणाचीच भ्रांत निर्माण झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा गावचा मार्ग निवडला आहे. करोना काळात कामगार भीतीने गावाकडे पळाले होते, आता ते शांतपणे पण व्यावहारिक विचार करून परतीकडे निघाले आहेत. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रसने थेट रेल्वे स्थानकांवर पाहणी केली. जे रस्त्यांवर किंवा बांधकाम सुरू असलेल्या जागेवर दिसलं नाही ते रेल्वे स्थानकांवर दिसलं आहे.
मुंबईतील दोन रेल्वे स्थानकांवर इंडियन एक्स्प्रेसने पाच दिवस पाहणी केली. यावेळी, त्यांनी शहराबाहेर जाणाऱ्या गाड्यांमधील १३० स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे ते शहर सोडून जात असल्याचं वास्तव यावेळी त्यांनी सांगितलं.
२४ वर्षीय विशेष त्यागी गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील प्लंबिंग साहित्य बनवणाऱ्या कारखान्यात काम करत आहे. तो नुकताच वाराणसीला आपल्या घरी सुट्टीसाठी गेला होता आणि १९ मार्चला परतला. मात्र, पाच दिवसांनंतर तो पुन्हा परतीच्या गाडीत बसला आहे. त्याला गॅस सिलिंडर मिळू शकला नाही, बाहेरून विकत घेऊन जेवणे परवडणारे नव्हते आणि त्यामुळे इथे थांबण्यात त्याला काहीच अर्थ वाटला नाही.
निम्म्याहून अधिक कामगार परतीच्या प्रवासाला
उत्तर प्रदेशला जाणारी कामायनी एक्सप्रेस, बिहारला जाणारी एलटीटी (LTT) राजगीर एक्सप्रेस आणि पश्चिम बंगालला जाणारी सीएसएमटी (CSMT) हावडा मेलमधील प्रवाशांशी संवाद साधण्यात आलाय. या गाड्यांची निवड मुद्दाम केली होती, कारण २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत येणाऱ्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेशचा वाटा सर्वाधिक आहे, त्यानंतर बिहार आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे १३० मजुरांच्या मुलाखती घेतल्या असता, ६२ जणांनी एलपीजी (LPG) संकटामुळे घरी परतत असल्याचे सांगितले. यापैकी एलटीटीवरील ७० पैकी ४० जणांनी, तर सीएसएमटीवरील ५० पैकी २२ जणांनी हेच कारण दिले.
काळा बाजार परवडेनासा
मजुरांच्या म्हणण्यानुसार, ५ किलोच्या सिलिंडरची काळ्या बाजारातील किंमत ५००-५५० रुपयांवरून थेट १,१००-२,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ९००-१,२०० रुपयांवरून ३,२००-४,००० रुपयांपर्यंत वाढले आहेत. बहुतांश मजुरांकडे अधिकृत गॅस कनेक्शनसाठी लागणारी कागदपत्रे (KYC) नसल्यामुळे त्यांना सरकारी दरात सिलिंडर मिळत नाही. हॉटेलमधील जेवण महाग झाले आणि साठवलेले पैसे संपू लागले, तेव्हा घरी परतणे हाच एकमेव पर्याय उरला.
हे स्थलांतर कोविड-१९ महामारीसारखे मोठ्या प्रमाणावरील ‘रिव्हर्स मायग्रेशन’ नाही. मजूर घाबरून पळून जात नाहीत, तर ते शांतपणे आणि व्यावहारिक विचार करून माघार घेत आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवून, ती पूर्वपदावर येताच परत येण्याचा त्यांचा बेत असल्याचंही यातून स्पष्ट झालं आहे. इतर काही मजूर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका, लग्न किंवा कौटुंबिक भेटींसाठी घरी जात होते.
कुसुम गुप्ता (३५): उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जाण्यासाठी एलटीटीवर आलेल्या कुसुम यांचे पती रिक्षाचालक आहेत. पतीने त्यांना स्टेशनवर सोडले आणि ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतच थांबले आहेत. चार-पाच दिवस गॅससाठी प्रयत्न करूनही यश आले नाही. त्या म्हणाल्या, “माझ्याकडे लाकूड किंवा कोळसा आणून स्वयंपाक करण्याची ताकद नाही, ती प्रक्रिया खूप कष्टाची आहे. रॉकेल मिळाले असते तर चालले असते, पण तेही मिळत नाही.”
सुखदीप बाओरी (२३): अंधेरीतील एका बांधकाम साईटवर काम करणारा सुखदीप आपल्या ११ सहकाऱ्यांसोबत पश्चिम बंगालला निघाला आहे. त्याने चार वेगवेगळ्या दुकानांसमोर तासनतास रांगा लावल्या, पण त्याचा नंबर येण्यापूर्वीच साठा संपायचा. त्याने पूर्णपणे मुंबईचे दार बंद केलेले नाही; निवडणुकांनंतर मालकाला फोन करून परिस्थितीचा आढावा घेऊन तो पुन्हा येण्याच्या बेतात आहे.
रांगेत जागा टिकवण्यासाठी रस्त्यावरच मुक्काम
भिवंडीसारख्या पॉवरलूम पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर आहे. गॅस एजन्सीबाहेर आपली जागा जाऊ नये म्हणून मजूर रस्त्यावरच चादर पसरून रात्र काढत आहेत. गॅस संपला की पुन्हा प्रतीक्षा सुरू होते. जे मजूर थांबले आहेत, त्यांना रोजंदारीवर पाणी सोडावे लागत आहे. एका तासाची प्रतीक्षा म्हणजे एका तासाची मजुरी गमावणे. सरस्वती कुमारी या माऊलीला गॅस नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मुलांना केवळ बिस्किटे भरवून त्यांची भूक भागवावी लागत आहे.
गॅस एजन्सींनी आता कडक नियम केले आहेत. सिद्धिविनायक गॅस एजन्सीचे मालक सागर कामुर्ती यांच्या मते, आता आधार तपशील आणि मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे. शुक्रवारी त्यांच्याकडे १२० सिलेंडर आले होते, पण तिथे ४०० ते ५०० लोक प्रतीक्षेत होते.
