BJP Shivsena Seat Sharing for BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत भाजपा व शिवसेना (शिंदे) दोन्ही पक्ष एकत्रित महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी भाजपा – शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील जागावाटप पूर्ण झाल्याचे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा १३७ जागांवर तर शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे.

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणाले, “मुंबईत भारतीय जनता पार्टी १३७ आणि शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या घटक पक्षांना या आकड्यांमध्ये समाविष्ट केले जाईल. भाजपा व शिवसेना एकत्रितपणे प्रचाराला सुरूवात करणार आहेत. मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा, महायुतीचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार आहोत. मुंबईकरांचा महापौर हा मुंबई महापालिकेत विराजमान झाला पाहिजे. ज्यामुळे मुंबईचा विकास, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहील. तसेच मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहीजे. आता एक नवीन मामुंची टोळी या मुंबई शहराचा ताबा घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना घरी पाठवण्याचं काम महायुती करणार आहे.” दरम्यान, २०० पेक्षा जास्त जागांवर भाजपा व शिवसेनेचे एकमत झाले होते. परंतु, २० जागांची चर्चा अपूर्ण होती. महायुतीचे सर्व उमेदवार आज नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील जागावाटप पूर्ण झाल्याचे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ” भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून १३७ जागा भाजपा तर ९० जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.” दरम्यान, काल (सोमवारी) भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगर पालिकेसाठीच्या ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

अजित पवारांना वगळलं

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने युती केली आहे. महायुतीत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळून भाजपा – शिवसेना युतीने जागावाटप पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत आतापर्यंत ६४ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

municipal-corporation-voting-dates-result-2026
महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक

कधी आहेत मुंबई महानगर पालिका निवडणुका?

गेल्या पाच वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका अखेर पुढच्या महिन्यात होऊ घातल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत महायुतीमधील मित्रपक्षांचा वरचष्मा पाहायला मिळाला. आता पुढच्या महिन्यात १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यभरातल्या २९ महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.