Mumabi Mahanagar Palika Election Results 2026: राज्यात काल पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत पुण्यात महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चुरस पाहायला मिळाली. आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पुण्यात सुरुवातीच्या कलात भाजपा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि कोथरूडचे आमदार यांनी भाजपा पुण्यात सुमारे ११५ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पाटील म्हणाले की, “आम्ही जी कामे केली आहेत ती लोकांना दिसू लागली आहेत. लोक आमच्या कामाच्या आधावार आमच्यावर विश्वास ठेवत आहेत. आम्ही नागरिकांसमोर, शिवसेनेला (ठाकरे गट) विकास करायचा होता तर त्यांनी आधी का नाही केला?, असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे बंधू एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊद्या हे नागरिकांच्या हिताचे नाही. नागरिकांच्या लक्षात आले आहे की, ते त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. भाजपाला मुंबईत ९० जागांवर विजय मिळेल आणि शिवसेनेला ४० जागा मिळतील. ही संख्या आणखी वाढेल पण कमी होणार नाही. दुसरीकडे पुण्यातही आम्ही ११५ पेक्षा कमी जागा जिंकणार नाही.”
२०१७ चा मुंबईतील निकाल
दरम्यान २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) ८४, भाजपा ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. ८४ जागांसह शिवसेना (ठाकरे गट) सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच जोरदार मुसंडी मारली होती. कारण २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपा अवघ्या ३१ जागा जिंकली होती.
२०१७ चा पुण्याचा निकाल
२०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपाने बाजी मारली होती. १६२ पैकी ७७ जागांवर विजय मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी एकत्रित राष्ट्रवादीला सत्ता राखण्यात अपयश आले होते. त्यांना फक्त ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेनेने १०, काँग्रेस १६ तर मनसेला ६ ठिकाणी विजय मिळवला होता.
