मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आलंय. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीबीने केलेल्या तपासात नांदेडमधील हा गांजा आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममधून आणण्यात आल्याचं समोर आलंय. तसेच नांदेडमधून पुढे हा गांजा जळगाव आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे एनसीबी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

नांदेडमध्ये नेमकी काय कारवाई झाली?

मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय.

ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातमध्ये पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत (Khalid Bakhsh) आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचंही बोललं जातंय. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.

गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केलीय. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ncb action on 1127 kg ganja in jalgaon near erandol pbs
First published on: 15-11-2021 at 12:54 IST