अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबई आणि आसपासच्या परिसरात ‘व्हाईट स्ट्राईक’ ही विशेष मोहीम राबवून एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत सुमारे १,७४५ कोटी रुपये किमतीचे ३४९ किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे अमली पदार्थ क्रिकेटचे ग्लोव्हज आणि पॅड्समध्ये अत्यंत शिताफीने लपवण्यात आले होते.
दोन टप्प्यांत पार पडली मोहीम
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दोन टप्प्यात करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून या रॅकेटवर पाळत ठेवली जात होती. त्यामध्ये पहिली कारवाई गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने नवी मुंबईतील कळंबोली येथील केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळ एका मारुती सुझुकी सुपर कॅरी वाहनाला अडवले. या गाडीची झडती घेतली असता, खोक्यांमध्ये ठेवलेल्या क्रिकेट पॅड्स आणि ग्लोव्हजच्या आत कोकेनची १३६ पाकिटे (प्रत्येकी १ किलो) सापडली. पोलिसांनी घटनास्थळावरून एका संशयिताला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर भिवंडीतील एका गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार दुसरी कारवाई करण्यात आली. भिवंडीतील रेहनाळ गावातील लक्ष्मण कंपाउंडमधील गोदामावर छापा टाकण्यात आला. तिथे आणखी २१३ पाकिटे जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३४९ किलो कोकेन हस्तगत करण्यात आले.
तस्करीची आगळीवेगळी पद्धत
तपासात असे समोर आले आहे की, हे कोकेन परदेशातून आयात केलेल्या यंत्रसामग्रीच्या पोकळ भागांमध्ये लपवून भारतात आणले होते. प्रत्येक पाकीट नऊ थरांच्या पॉलिथीनमध्ये गुंडाळले होते आणि त्यावर काळ्या ग्रीसचा थर लावला होता, जेणेकरून ते कोणाच्याही नजरेस पडू नये. हे अमली पदार्थ आधी गोदामात साठवली जायचे आणि त्यानंतर क्रिकेट साहित्याचा वापर करून ते पुढे वितरित केले जात होते.
गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक
या मोठ्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘X’ वर पोस्ट करत एनसीबीचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “आम्ही अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहोत. एनसीबीने मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन जप्त करून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. हे ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे उत्तम उदाहरण आहे.”
कारवाईचे महत्त्व
साधारणपणे भारतात वर्षभरात एकूण २०० ते ३०० किलो कोकेन जप्त केले जाते. मात्र, या एकाच कारवाईत ३४९ किलो साठा सापडल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार, अर्थपुरवठा करणारे आणि खरेदीदार यांचा शोध घेण्यासाठी एनसीबीने आता आपला तपास अधिक तीव्र केला आहे.
