Mumbai Police Delhi Model and Dipke Detention Video Protest Reels Strategy : नीट पेपरफुटीप्रकरणी झालेलं आंदोलन असो वा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी झालेलं आंदोलन असो, दोन्ही आंदोलनात दिल्ली पोलीस चर्चेच्या केंद्रस्थानी होते. दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळलं, त्याची सोशल मीडियासह सगळीकडे चर्चा झाली. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या मॉडेलवर आता मुंबई पोलीस अभ्यास करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या व्हिडिओंवर लक्ष
दिल्ली पोलिसांच्या एक्स हँडलवरून गेल्या आठवड्यात व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. या व्हिडिओंमध्ये महिला कॉन्स्टेबल डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडणे, गर्दीकडून पोलिसांना धक्काबुक्की केली जाणे, पोलिसांच्या खांद्यावरील पट्टे (शोल्डर स्ट्रॅप्स) फाडले जाणे आणि आंदोलक त्यांच्याशी आक्रमकपणे बोलत असल्याचं दिसत आहे. इतर व्हिडिओंमध्ये पोलीस कर्मचारी नजरकैदेत असलेल्या आंदोलकांना प्रथमोपचार, अन्न आणि औषधे पुरवताना दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी काही महत्त्वाचे क्षणही रेकॉर्ड केले होते, ज्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना त्यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली होती.
मुंबईतील आंदोलनांदरम्यान अनेक युट्युबर्स आणि अनेक माध्यमांनी पोलिसांच्या गर्दी हाताळण्याच्या पद्धतीचं चित्रीकरण केलं होतं. मध्य मुंबईतील एका वरिष्ठ निरीक्षकाने सांगितलं की, “यातील बऱ्याच व्हिडिओंमध्ये पोलिसांची प्रतिमा नकारात्मक दाखवली जाते, यामुळे पोलीस आंदोलकांबद्दल असंवेदनशील असल्याचा समज निर्माण होतो. मात्र, पोलिसांना किती मानसिक ताण आणि शारीरिक कष्टाचा सामना करावा लागतो, हे कधीच समोर येत नाही.” एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दुसरी बाजू देखील समोर यावी यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलने हाताळताना त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थितीचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं.
पोलिसांच्या कृतींकडे कसं पाहिलं जातंय, याबाबत सतर्क राहा
दिल्ली पोलिसांनी आजीच्या निधनाबद्दल अभिजीत दिपकेंना माहिती देतानाचा क्षण व्हिडिओमध्ये कैद केला. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओही समाज माध्यमांसमोर आणला. या व्हिडिओर अभिजीत दिपकेंनी दावा केला होता की हा व्हिडिओ संपूर्ण जारी केलेला नाही. सूत्रांनी सांगितलं की, “या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या एका बैठकीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसांना त्यांच्या कृतींकडे कशा प्रकारे पाहिले जातं याबद्दल सतर्क राहण्यास सांगितलं आणि दिल्ली पोलिसांनी वापरलेली काही उदाहरणे दिली.”
मुंबईतही गेल्या काही दिवसांत अनेक आंदोलने पाहायला मिळाली आहेत, ज्यात शनिवारी दक्षिण मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलन, त्यानंतर रविवार आणि सोमवारी शिवाजी पार्कबाहेर झालेली आंदोलने समाविष्ट आहेत. मुंबई पोलिसांचा एक मोठा गट गेल्या काही आठवड्यांपासून गणेशोत्सव, माऊंट मेरी उत्सव आणि नवरात्रीच्या बंदोबस्तासह आंदोलनांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.
दिल्ली पोलीस आणि परसेप्शन
दिल्ली पोलिसांनी २०२१ मध्ये परसेप्शन मॅनेजमेंट विभाग तयार केला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांची नकारात्मक प्रतिमा दाखवणाऱ्या व्हिडिओंचा सोशल मीडियावर प्रतिकार करण्यासाठी हा विभाग सक्रिय असल्याचं मानलं जातं. सध्या एका उपायुक्त दर्जाचे अधिकारी या दलाच्या परसेप्शन मॅनेजमेंट अँड मीडिया सेलचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत आणि ते जनसंपर्क अधिकारी देखील आहेत. सोशल मीडियावर आंदोलनांच्या संदर्भात पोलिसांवर होणाऱ्या नकारात्मक कमेंट्सचा प्रतिकार करण्यातही हा विभाग गुंतलेला होता या हँडलने सोशल मीडियावरील कथित खोट्या दाव्यांविरुद्ध फॅक्ट चेक्स (सत्यता पडताळणी) देखील जारी केली आहे.
