Mumbai Police Fake Employee Salary Scam: मुंबई पोलीस दलात ज्यांनी कामच केले नाही, अशा १० कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दोन वर्षांत ६.४ कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. २०१९ ते २०२० साली घडलेल्या या घोटाळ्याचा तपास आता मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. टाइम्स नाऊ संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

प्राथमिक तपासानुसार, हे १० कर्मचारी फक्त अधिकृत नोंदीमध्येच अस्तित्वात होते. त्यांनी कधीही मुंबई पोलीस दलात काम केले नाही. तरीही त्यांच्या खात्यात दोन वर्ष वेतन जमा होत होते, यामुळे सरकारी तिजोरीतून ६.४१ कोटी रुपये लाटले गेले. यानंतरही जवळपास सहा वर्ष हा घोटाळा लपून राहिला. अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये ही बाब निदर्शनास आली आहे.

लेखापरीक्षणात वेतन नोंदी आणि हजेरीपटावरील नोंदीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर ही बाब समोर आली. तपासकर्त्यांना संशय आहे आहे की, पोलीस दलाच्या प्रशासनातील अधिकारी आणि वेतन विभागातील कर्मचाऱ्यांनी नोंदीमध्ये छेडछाड करून वेतन घोटाळा केला असावा. ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्यांची हजेरी नियमित लावण्यात येत होते. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय त्यांचे वेतन जमा केले जात होते.

सूत्रांनी टाइम्सनाऊला दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या नोंदी आणि वेतन व्यवहाराची तपासणी केल्यानंतर सदर अनियमितता समोर आली. कर्मचारी डेटा आणि वेतन नोंदीची माहिती तपासात असताना वेतन खाती आणि हजेरी नोंदींत विसंगती आढळून आल्यानंतर या प्रकाराची सखोल तपासणी करण्यात आली, ज्यात सदर अनियमितता लक्षात आली.

घोटाळ्यातील रक्कम मोठी असल्यामुळे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलाबाबत शंका उपस्थित झाली आहे. टाइम्सनाऊने दिलेल्या बातमीनुसार, या कटात सामील असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, तसेच या कटात पोलीस दलातीलच मोठ्या साखळीचा हात असल्याचा संशय आल्यामुळे हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. तपासकर्त्यांना वेतनाचा पैसा कुठे आणि कुणाच्या खात्यात गेला, हे शोधून काढण्याचे आव्हान असणार आहे.