मुंबई पाठोपाठ पुण्यातही भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. मुंबई आणि पुण्यातील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. मुंबईतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने विजय संपादन केला तर तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी विजय मिळवत भाजपाला धक्का दिला आहे.

तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी विजय मिळवला. अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी भाजपाच्या कृष्णा म्हाळसकर यांचा ७९५ मतांनी पराभव केला. संगीता शेळके यांना एक हजार ४५२ मतं मिळाली, तर कृष्णा म्हाळसकर यांना ६५७ मतं पडली.

मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे यांनी विजय मिळवला आहे. ते प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भाजपा उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना चार हजार ४२७ मतं मिळाली, तर भाजपच्या दिनेश पांचाळ यांना तीन हजार ४२ मतं पडली. त्यामुळे एक हजार ३८५ मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.

दरम्यान, विधानसभेला भाजपामधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांच्या विरोधात दंड थोपटले आणि ते विक्रमी मताधिक्याने विजय झाले. त्यानंतर हळूहळू भाजपाला मावळ परिसरात उतरती कळा लागली आहे. आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्याची गुरुवार रोजी पोटनिवडणुकिसाठी मतदान झाले होते. आज शुक्रवार रोजी सकाळी निकाल मतमोजणी झाली. महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार संगीता शेळके (अपक्ष) या विजयी झाल्या आहेत. त्यांनी माजी राज्यमंत्री भेगडे यांचे समर्थक कृष्णा म्हाळसकर यांचा पराभव केला आहे.

संगीता शेळके या आमदार सुनील शेळके यांच्या काकी आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, हा विजय मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांचा झालेला आहे. या विजयाच श्रेय आमदार शेळके यांना देत आहे. पोटनिवडणुकीत विजय निश्चित होता, निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी कठोर परिश्रम घेतले अस ही त्या म्हणाल्या. यावेळी संगीता शेळके याना आनंदाश्रू अनावर झाले होते.