अलिबाग : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण जखमी झाले. नियंत्रण सुटलेल्या कंटेनर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर तो उलटून इनोव्हा कारवर कोसळल्याने हा अपघात घडला.
सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने त्याने मार्गावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर डाव्या बाजूला उलटून थेट इनोव्हा कारवर पडला. या भीषण दुर्घटनेत इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकूण पाच वाहने या अपघातात नुकसानग्रस्त झाली.
अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे
– अंबादास दामू पेटारे
– श्रीकांत अनंत जाधव
– प्रमोद संतोष पवार
