अलिबाग: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले. बोरघाटातील खोपोली मिसिंग लिंक जवळील परिसरात मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर हे अपघात घडले. दोन तासात घडलेल्या या दोन अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मिसिंग लिंक परिसरात सध्या अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.

पहिला अपघात चार वाहने एकमेकांना धडकल्याने झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बसने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. ज्या चार वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करेपर्यंत महामार्गावर दुसरा अपघात झाला.

दुसऱ्या अपघातात तीन ट्रक एकमेकांना धडकले. तीव्र उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून जात असलेल्या दोन ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मधल्या ट्रकचा चक्काचूर झाला. या ट्रकमधील रंग सदृश्य केमिकल संपूर्ण महामार्गावर पसरले गेले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकमधील रंगाचे डबे आणि अन्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घाट परिसरात चार ते पाच किलोमीटर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनची टीम तसेच आयआरबीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.