अलिबाग – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावाच्या हद्दीत ४० ते ५० फूट खोल दरीत ट्रक कोसळूला. या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाची तब्बल दोन तासांच्या अथक बचावमोहीमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.पुण्याकडून मुंबईच्या दिशेने दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणारा ट्रक द्रुतगती महामार्गावरील किलोमीटर ३६.३०० येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने खालापूर जवळील ढेकू गावात उलटला. रस्त्यापासून सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला. दरीत दाट झाडी, निसरडा उतार आणि अंधार असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण बनले होते.
अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील देवदूत यंत्रणा आणि लोकमान्य रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुरुवारी पहाटे सुमारे १.४५ वाजता हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सौरभ घरत, निलेश कुदळे, धर्मा पाटील आणि फारूक शेख हे दोरखंड, स्पाईन बोर्ड व अन्य बचाव साहित्यांसह घटनास्थळी पोहोचले.दरीत उतरलेल्या पथकाला ट्रकचालक रवी राठोड गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. लोकमान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच प्राथमिक उपचार करून रक्तस्त्राव नियंत्रणात आणला.
बचावकार्यात आणखी एक अडचण निर्माण झाली. जखमी चालकाने सुरुवातीला ट्रकमध्ये आणखी तीन जण अडकल्याचे सांगितल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानुसार समांतर शोधमोहीमही राबविण्यात आली. मात्र, चालकाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तो ट्रकमध्ये एकटाच असल्याचे स्पष्ट झाले. ट्रक मालकाशी संपर्क साधूनही याची खातरजमा करण्यात आली. यानंतर अत्यंत निसरड्या उतारावरून चालकाला स्पाईन बोर्डवर सुरक्षित स्थिर करून दोरखंड आणि क्रेनच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने वर आणण्यात आले.
सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुरक्षित सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले.त्यानंतर जखमी चालकाला लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बचाव मोहिमेत महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, एमएसआरडीसीची देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाचे कर्मचारी आणि हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी उल्लेखनीय समन्वय साधत धाडसाने काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राबविण्यात आले. चालकाला डुलकी लागल्याने, ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
