मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ काम सुरू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यावरील डोंगराचे सल झालेले दगड आणि धोकादायक दरडी काढायला बुधवारी सुरुवात करण्यात आली. मुंबई-पुणे या माíगकेवर दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत चार वेळा वाहतूक बंद करून हे दगड व दरडी काढण्यात आल्या. हे काम गुरुवारी (२३ जून) देखील सुरू राहणार आहे. या कामाची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे द्रुतगती मार्गावर बुधवारी वाहनांची संख्या कमी होती.

दोन दिवसात आडोशी बोगद्यावरील डोंगरावर २४० मीटर अंतरावर दगड पाडत जाळी लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आडोशी बोगद्याजवळ दरडी पाडण्याच्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, रायगड महामार्गचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. जी. सावंत, रायगड जिल्हा वाहतूक नियत्रंण कक्षाचे पोलीस निरीक्षक मनोज महात्रे आदी उपस्थित होते.गेल्या पावसाळ्यात खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा दरम्यान वारंवार दरडी पडून वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडले होते. आडोशी बोगद्याजवळ पडलेल्या दरडीत काही प्रवासी दगावले होते. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र शासन व रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने तज्ज्ञ समितीमार्फत या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. धोकादायक दरडी काढण्याचे तसेच डोंगराला सुरक्षा जाळी लावण्याचे काम मेकाफेरी या इटालियन कंपनीला देण्यात आले होते. वर्षभरात खंडाळा ते आडोशी दरम्यान ९४० मीटर अंतरात सुरक्षा जाळी लावण्यात आली.