Mumbai Pune Expressway Traffic Jam: : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खोपोलीजवळील बोरघाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे घाट सेक्शन मधील अंतर पार करण्यासाठी तब्बल एक ते दीड तासाचा कालावधी लागत होता.

अमृतांजन पुलापासून खोपोली एक्झिट पर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्या मिळाल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कासवगतीने पुढे सरकत आहे.

महामार्ग वाहतूक पोलीस, IRB यंत्रणा आणि डेल्टा फोर्सकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक नियंत्रणात अडचणी येत आहेत. दररोज द्रुतगती मार्गावर साधारणपणे दहा ते पंधरा हजार वाहने एका वेळेस प्रवास करत असतात पण वाहनांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. घाटात गाड्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहतूक समस्या अधिकच बिकट होत आहे.जुन्या महामार्गावरही वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.