अलिबाग- रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. ताम्हिणी घाट खचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पावसामुळे वाहतुक व्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांचा कोंडी झाली असून, प्रवासी अडकून पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही तोवर महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तर कशेडी घाटात अनुसया हॉटेल जवळ दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुक बंद झाली आहे.

ताम्हिणी घाट खचला…

पुण्याहून रायगडला येणारा ताम्हिणी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आगहे. ताम्हिणी घाटात मुळशी तालुक्याच्याहद्दीत शंकराच्या मंदीरापासून तीनशे मीटर अंतरावर अतिवृष्टीमुळे रस्ता खचला आहे. त्यामुळे पुण्याकडून कोलाडच्या दिशेने येणारी आणि कोलाड कडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाडकडून पुण्याला जाणारा वरंधा घाट दरडी कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. तर पोलादपूर कडून महाबळेश्वरकडे जाणारा मार्ग दरडी कोसळत असल्याने वाहतूकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे तीन प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

मुंबई पुणे दृतगती मार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली

मुंबई पुणे मिसिग लिंकवर सोमवारी पहाटे दरड कोसळली. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर दोन नंबरच्या बोगद्या जवळ ही दुर्घटना घडली. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पहाटे चारच्या सुमारास मिसिंग लिंकवर दगड आणि मातीचे ढिगारे अचानकपणे कोसळले. या दुर्घटनेनंतर मिसिंग लिंकवरील पुणेकडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाच्या यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या असून दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई पुणे दृतगतीवर वाहतूक रोखली

मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील खालापूर जवळ फूड मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. परिणामी मुंबईकडे आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणी ओसरल्यानंतर आणि रस्त्याची पाहणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे