Mumbai Pune Expressway Landslide Act of God : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प हा अभियांत्रिकी चमत्कार असून या प्रकल्पाच्या उभारणीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, हा दावा हा मार्ग खुला होताच ९ आठवड्यांतच फोल ठरला आहे. गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. परिणामी काही काळ येथील वाहतूक ठप्प होऊन मुंबई-पुण्याचा संपर्क तुटला होता. ७१८० कोटी रुपये खर्च करून मुंबई-पुणेकरांच्या सोयीकरता दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘मिसिंग लिंक’वर दरड कोसळल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) निसर्गावर खापर फोडत याला “दैवी प्रकोप” म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

निसर्गाचा खेळ

इंडियन एक्स्प्रेसने MSRDC चे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “यात कंत्राटदाराची काहीही चूक नाही, हा केवळ निसर्गाचा खेळ आहे. ” MSRDC ने स्पष्ट केलं की दरडी कोसळण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना आणि डिझाइन्स तयार करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांनाही एक मर्यादा होती.

दैवी प्रकोप

दुसऱ्या एका MSRDC अधिकाऱ्याने या घटनेला देवाचा प्रकोप झाला असल्याचं म्हटलं आहे. “आयआयटी-बॉम्बेकडून प्रमाणित केलेले रॉक फॉल प्रतिबंधक उपाय तिथे करण्यात आले आहेत. यामध्ये बोगद्याच्या वर डोंगरावर १५ मीटर उंचीपर्यंत रॉक बोल्टिंग (लोखंडी जाळी) बसवण्यात आली आहे, जी अजूनही सुरक्षित आहे. परंतु, खाली पडलेले मोठे दगड हे सुमारे १५० मीटर उंचीवरून आले आहेत. दैवी प्रकोपासारखा एवढा मुसळधार पाऊस पडल्याने दरड रोखण्यासाठी फार काही करता येत नाही”, असं संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. “पाऊस थांबल्यानंतर, आम्ही या खडकांची तपासणी करू आणि ही जाळी अधिक उंचीपर्यंत वाढवणे शक्य आहे का ते पाहू. ही एक खर्चिक बाब असेल आणि यासाठी वनविभागाच्या जमिनीचा वापर करावा लागेल”, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

मुंबई-पुणे महामार्गावर नेमकं काय घडलं?

सोमवारी ६ जुलै रोजी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिसिंग लिंक’च्या पुणे-मुंबई मार्गिकेवरील पहिल्या बोगद्याच्या शेवटी दरड कोसळली. यामुळे संरक्षक भिंतीचं नुकसान झालं असून हा मार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे डोंगराच्या वरच्या भागातून काही मोठे दगड खाली घसरले, यामुळे बोगदा क्रमांक दोनचं प्रवेशद्वार बंद झालं.

ते म्हणाले, “मुसळधार पावसामुळे डोंगराच्या वरच्या भागातून आलेले मोठे दगड बोगदा क्रमांक २ च्या तोंडावर पडले. बोगद्याच्या मूळ संरचनेला कोणतीही इजा झालेली नाही, परंतु बोगद्याच्या कडांवर बांधण्यात येणारी बाह्य रचना म्हणजेच फॉल्स फ्रेमचं नुकसान झालं आहे.”

मिसिंग लिंकवर खड्डे, फडणवीस म्हणाले…

रविवारी ‘मिसिंग लिंक’ रस्त्यावर काही खड्डे पडल्याचंही समोर आलं होतं, यामुळे विरोधी पक्षांना राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एक लहान घटना असल्याचं सांगत या प्रकरणाला फारसं महत्त्व दिलं नाही.

मोठी दुर्घटना टळली?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुरक्षा यंत्रणेमुळे (Barriers) दगडांच्या कोसळण्याचा वेग आणि प्रभाव कमी होण्यास नक्कीच मदत झाली. जर हे सुरक्षा कवच तिथे नसतं, तर वरून पडणाऱ्या या मोठ्या खडकांमुळे होणारं नुकसान प्रचंड मोठे असू शकलं असतं.” या सुरक्षा यंत्रणेमुळे वरून येणाऱ्या दगडांचा वेग मंदावला आणि त्यांना थेट वाहनांवर आदळण्यापासून रोखलं. जर हे उपाय योजले नसते, तर याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकले असते”, असं अधिकारी म्हणाले.

पावसाळ्यानंतर भौगोलिक सर्वेक्षण करणार

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पावसाळ्यानंतर ते या भागाचे नव्याने भौगोलिक सर्वेक्षण करतील; जेणेकरून रॉकफॉल सुरक्षा यंत्रणा डोंगराच्या आणखी वरच्या भागापर्यंत वाढवता येईल का, याचा निर्णय घेता येईल. डोंगरावर आणखी उंचीवर जादा लोखंडी जाळी बसवता येईल का, याची आम्ही तपासणी करू. परंतु यामध्ये मोठा खर्च येईल आणि हे काम वनविभागाच्या जमिनीवर करावं लागेल.”

सध्याची स्थिती काय?

मिसिंग लिंकवरील दरडीचा मलबा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि संबंधित बांधकाम कंपनीने रात्री १० वाजता पूर्णपणे हटविला आहे. एमएसआरडीसी, रस्ता सुरक्षा अभियंता आणि बांधकाम कंपनी यांनी संबंधित मार्गाची पाहणी करून तो सुरक्षित असल्याचं घोषित केल्यानंतर, दोन मार्गिकांवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित दोन मार्गिकांवर अद्याप पाणी वाहत असल्याने, सध्या अंशतः वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.