Mumbai Pune Expressway Missing Link inauguration by CM Devendra Fadnavis: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गाच्या उद्घाटनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा सुरू झाला. १३ किमींच्या या नव्या मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटले जात होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला कनेक्टिंग लिंक म्हणावे, असे आवाहन केले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कुसगाव ते खोपोली मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटले गेले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गाची निर्मिती केली. या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे. एमएसआरडीसी आणि त्यांच्या अभियंत्यांनी उत्तम काम करत हा मार्ग उभारला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हा महामार्ग कसा उभारला गेला, यामागचा घटनाक्रमही सांगितला.
कनेक्टिंग लिंकमुळे जागतिक विक्रम
नव्या मार्गिकेमुळे मुंबई-पुण्यातील अंतर ६ किमींनी आणि प्रवासाचा ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या मार्गामुळे जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. जगातील सर्वात उंच केबलस्टेड पूल इथे तयार केला असून त्याची उंची १८२ मीटर आहे. नदीवर उभारलेला हा पूल अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. तसेच लोकांचा वेळही वाचणार आहे.
आधीच्या सरकारवर टीका
कनेक्टिंग मार्गिकेची माहिती देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीकाही केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा २०१० साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही, यासाठी आधीच्या सरकारने १३ कारणे दिली. यात एक कारण असेही होते की, लोणावळा तलावाच्या खालून हा मार्ग जात असल्यामुळे तो करता येणार नाही, असेही एक कारण यात दिले गेले.
महायुतीचे सरकार आल्यानंतर मी एमएसआरडीसीचे अधिकारी मोपलवार, आनंद कुलकर्णी यांना याबाबतचे कारण विचारले. त्यांनी हा मार्ग होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. डिसेंबर २०१५ ला जुन्या सरकारचा निर्णय बदलून आम्ही मिसिंग लिंक करणार असल्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.
अभियांत्रिकी आव्हान कसे पेलले?
१८२ मीटर उंचीच्या केबलस्टेड पुलाबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियांत्रिकी आव्हान होते. याठिकाणी जोरदार वारे वाहत असतात. रायगड जिल्ह्यापासून ते पुण्यापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वेगवेगळा आहे. हे सर्व लक्षात घेऊन पुलाची उभारणी करण्यात आली. मागच्या काळात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १३० ते १५५ किमी होता. आपण तयार केलेला केबलस्टेड पूल ताशी २४० किमी वेग असतानाही तग धरू शकतो. चक्रीवादळापेक्षा दुप्पट गतीने वारा वाहिला तरी या पुलाला काही होणार नाही.

भारतासहीत सात देश या पुलाच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते. याचे मूळ डिझाइन कॅनडामध्ये तयार झाले. डेन्मार्कमध्ये त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबलची चाचणी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आली. केबलचे उत्पादन मलेशियाच्या कंपनीने केले. रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज यांनी संयुक्तपणे केले. पुलाचे आरेखन तैवानच्या कंपनीने केले. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट सिंगापूरचे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवरायांच्या त्या लढाईचाही दिला दाखला
या मार्गिकेचे वर्णन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक दाखला दिला. “१६६१ साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्याकरिता उंबरखिंडीची लढाई केली होती. ती लढाई या प्रकल्पाच्या ठिकाणीच झाली होती, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या लढाईचे नेतृत्व केले होते. पाच हजार मावळ्यांनी मुघलांच्या लाखो सैनिकांना कापून काढले. या लढाईने स्वराज्याकरिता खूप मोठे परिवर्तन केले. त्यामुळे ही जागा अतिशय महत्त्वाची आणि पवित्र अशी आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुप्रिया सुळेंना लगावला टोला
“मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खासदार सुप्रिया सुळेही वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रिया सुळेंना सांगू इच्छितो की, तुम्ही आज शेवटचे ट्रॅफिकमध्ये अडकलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ कधीही येणार नाही. हे काम तुमच्या सरकारने केले नाही. ते आमच्या महायुतीच्या सरकारने करून दाखवले आहे”, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आहे कसा?
मुंबई – पुणे या दोन शहरातील अंतर आणखी कमी करून प्रवास अधिक जलद करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम हाती घेतले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामाला दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली – कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी झाला आहे. या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात आले आहेत. यातील एक बोगदा १.७५ किमीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. २१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा असून हा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असेल, असा दावा केला जात आहे. तर ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा जात आहे.
