Pune Mumbai Missing Link Traffic Jam: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. सरकारच्या महत्वकांक्षी आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, उद्घाटन सोहळा आणि सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती महामार्गावर प्रंचड वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांना ३ ते ४ तास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागले. खासदार सुप्रिया सुळे यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसला.

मुख्यमंत्र्यांनी मागितली प्रवाशांची माफी

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीवरुन मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागितली. “मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडकले होते”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम देखील नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा सुरू झाला.

सुप्रिया सुळेंना टोला

मिसिंग लिंकच्या कामावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. “सुप्रिया सुळेही ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रिया सुळेंना सांगू इच्छितो की तुम्ही हे शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ कधीही येणार नाही. हे काम तुमच्या सरकारनं बंद केलं होतं, ते आमच्या महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं आहे”, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका

शुक्रवारपासून सलग आलेल्या सुट्ट्या, शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या यामुळे गावाकडे निघालेले अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. खासदार सुप्रिया सुळेही यांनाही मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दोन तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी एका व्हिडीओद्वारे महामार्गावरील परिस्थिती दाखवून दिली. त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवासी आणि चालकांशी देखील संवाद साधला. त्यांचा हा व्हिडीओय सर्वत्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘मिसिंग’ नव्हे ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कुसगाव ते खोपोली या १३ किमींच्या नव्या मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटले जात होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणावे, असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गाची निर्मिती केली. या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे. एमएसआरडीसी आणि त्यांच्या अभियंत्यांनी उत्तम काम करत हा मार्ग उभारला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.