Mumbai Pune Expressway Missing Link Landslide: मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहुतकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरु असले तरी नागरिकांना मुंबई-पुणे किंवा पुणे – मुंबई प्रवास शक्य असल्यास टाळण्याचे आवाहन केले आहे. मिसिंग लिंकवर पहाटेच्या सुमारास कोसळलेल्या दरडीवरुन विरोधकांनी आता सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मिसिंग लिंकची सुरक्षा तपासणी न करता उद्घाटन करण्यात आले का? असा सवाल उपस्थित करत या मार्गाबाबतची समस्या जून महिन्यातच लक्षात आली होती असे मत मांडले.
मिसिंग लिंकवर दरड कोसळली
दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शिवाय सोमवारी पहाटे ०१ मे रोजी लोकार्पण केलेल्या मिसिंग लिंकच्या बोगद्यात दरड कोसळून पावसाचे पाणी, माती व मुरुम आणि दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत अवघ्या दोन महिन्यात दरड कोसळ्याने विविध प्रश्न उपस्थित केले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“१ मे २०२६ रोजी ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन करण्यात आले. सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव… ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा… काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच! आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत. की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी एक्सवर केलेल्या पोस्टवरुन उपस्थित केला.
जून मध्येच समस्या लक्षात आल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
आदित्य ठाकरेंनी मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती, असे म्हटले आहे. तसेच, जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना या मार्गाबाबत समस्या लक्षात आल्याचेही ठाकरेंनी म्हटले आहे. “जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो”, असा अनुभव आदित्य ठाकरेंनी मांडला आहे. “भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला”, अशी टीका देखील ठाकरेंनी केली.
हर्षवर्धन सपकाळांची टीका
“पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे! दोन खड्ड्यांना “पहिल्या पावसाचं टेस्टिंग” म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही “मान्सून ट्रायल” म्हणणार का?”, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
रोहित पवारांकडूनही समाचार
“मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?”, असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी, “मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे”, असा आरोप सरकारवर केला.
प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, प्रशासनाकडून मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरूअसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मार्ग सुरू होताच व वाहतुकीबाबत कोणताही निर्णय झाल्यास अधिकृत माध्यमांद्वारे नागरिकांना तात्काळ माहिती देण्यात येईल असे स्पष्ट करताना नागरिकांनी मुंबई–पुणे / पुणे–मुंबई प्रवास शक्य असल्यास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
