मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर कोसळलेल्या दरडीच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलंच वादळ उठलं आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना “१ कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले” आणि “भाड्याचे टट्टू” अशा अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला होता. फडणवीसांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता विरोधकांनीही “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही!” असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला आहे.
‘१ कोटी खोटारडे मेले तेव्हा हे पैदा झाले’; फडणवीसांचा घणाघात
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ समजल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पावर दरड कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावरून विरोधक आणि नेटकऱ्यांनी सरकारला धारेवर धरले होते.
“देवेंद्र फडणवीसला हव्या तेवढ्या शिव्या द्या, मी आता ‘शिव्या प्रुफ’ झालो आहे. पण स्वतःच्या राज्याची बदनामी करून इथल्या सर्वोत्तम प्रकल्पांवर चिखलफेक करू नका. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील, ज्यांना खोटे बोलायला लाजही वाटत नाही.” – देवेंद्र फडणवीस
सोशल मीडियावरील ‘त्या’ ट्रोल्सना थेट इशारा
पैशांच्या जोरावर सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “ज्यांना गल्लीत कुत्रं विचारत नाही, ते आज सोशल मीडियावर येऊन शिव्या देत आहेत. पैसे घेऊन लिहिणाऱ्या अशा ‘भाड्याच्या टट्टूंना’ आपण सोडणार नाही.” तसेच, या प्रकल्पावर भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचेच नाव असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘चोराच्या उलट्या बोंबा!’; भास्कर जाधव, हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड यांचा पलटवार
फडणवीसांच्या या ‘भाड्याचे टट्टू’ आणि ‘खोटारडे’ या शब्दांवर विरोधक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे.
- भास्कर जाधव (शिवसेना आमदार): “एकेकाळी तुम्हीही विरोधी पक्षनेते होतात, तेव्हा तुम्ही किती आरोप करत होतात? कोविड काळात तुम्ही उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे काय? सकाळी आशिष शेलार, ११ वाजता लाड-दरेकर, दुपारी २ वाजता चंद्रकांत दादा आणि दुपारी ४ वाजता तुम्ही स्वतः पत्रकार परिषदा घेत सुटला होता. तेव्हा तुम्ही केलेले बेछूट आरोप चालत होते का? तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही!”
- हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष): “मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. ‘वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही’ असं कोण म्हणालं होतं? काल नाशिकमध्ये ढगफुटी होईल असं त्यांनी सांगितलं, पण पाऊस झाला नाही. मग खरं-खोटं कोण बोलतंय हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे. जर प्रश्न विचारणारे ‘भाड्याचे टट्टू’ असतील, तर निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांना ‘टक्केवारी पुरुष’ म्हणावं लागेल!”
- वर्षा गायकवाड (काँग्रेस खासदार): “हजारो कोटींच्या प्रकल्पातील त्रुटींवर दोन महिन्यांतच प्रश्न उपस्थित झाले, तर जनतेचा हिशोब मागणारे महाराष्ट्रद्रोही ठरत नाहीत. कंत्राटदारांचा भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते, प्रश्न विचारणाऱ्यांमुळे नाही. लोकशाहीत टीकाकारांना ‘भाड्याची लोकं’ म्हणणे मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभत नाही.”
फडणवीसांचं शेरो-शायरीतून प्रत्युत्तर
मुंबईतील पाऊस आणि मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी शेरो-शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. “गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले…” (मैदानात तेच पडतात जे घोडेस्वारी करतात, जे आधीच गुडघ्यावर चालतात ते काय पडणार!) “आम्ही निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांचं म्हणणं होतं की हे शक्य आहे, आपण हे करू शकतो आणि आपण ते करून दाखवलं,” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांची टीका फेटाळून लावली.
