अलिबाग- दरड हटविल्यानंतर मिसिंग लिंक वाहतूकीसाठी रात्री उशीरा खुला करण्यात आला. एमएसआरडीसी, सेफ्टी इंजिनिअर्स, संबधित बांधकाम कंपनी यांनी पहाणी करून मिसिंग लिंक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सुचित केल्यानंतर रात्री उशीरा पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात आली. सोमवारी लोणावळा आणि खोपोली परीसरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मुंबई पुणे दृतगती मार्गाला बसला, होता मिसिंग लिंकवर दुसऱ्या बोगद्या जवळ दरड कोसळली, तर खालापूर जवळ फुडमॉल जवळ पावसाचे पाणी महामार्गावर आल्याने, सकाळच्या सत्रात दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

रविवारी पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात २४ तासात ६२५ मिलीमीटर, तर रायगड जिल्ह्यातील खोपोली परीसरात ३२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीचा एकत्रित परिणाम मुंबई पुणे दरम्यानच्या वाहतुकीवर झाला. मुंबई पुणे दृतगती मार्ग आणि मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील वाहतुक सोमवारी सकाळच्या सत्रात पुर्णपणे विस्कळीत झाली होती. दृतगती मार्गावर मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे दरड कोसळली होती. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर दोन नंबरच्या बोगद्या जवळ ही दुर्घटना घडली.

अतिवृष्टीमुळे साडे तीनच्या सुमारास दगड आणि मातीचे ढिगारे बोगद्याच्या बाहेरील कमानीचा काही भाग अचानकपणे कोसळला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर मिसिंग लिंकवरील पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. महामार्ग विभागाच्या यंत्रणांनी दरड हटविण्याचे काम हाती घेतले आहे. संध्याकाळी हे काम पूर्ण झाले. यानंतर एमएसआरडीसी, सेफ्टी इंजिनिअर्स आणि मिसिंग लिंकचे बांधकाम करणारी कंपनी यांनी या ठिकाणची पहाणी केली.

मिसिंग लिंक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सुचित केल्यानंतर रात्री दहा वाजून दहा मिनटांनी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. सध्या खबरदारी म्हणून या मार्गिकेवरील दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरीत दोन लेनवर अद्याप डोगंरावरून पाण्याचा प्रवाह येत असल्याने बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर उर्वरीत दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र यांच्या मार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक हळुहळु पूर्वपदावर येत आहे. खालापूरच्या फुडमॉल जवळ दृतगती मार्गावर आलेले पाणीही पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.