अलिबाग: मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग लागली. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरील पुण्याचे दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आग विझवण्यासाठी पनवेल, खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. सकाळी पावणेआठच्या सुमारास महामार्गावर १६ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बस मधून धुराचे लोट येण्यास सुरुवात झाल्याने चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्याचे सुचित केले. काही वेळातच बसने पेट घेतला. आगीचे प्रचंड लोळ बस मधून बाहेर येऊ लागले. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली.
बसला आग लागल्याची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिका आणि खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
#WATCH | Khalapur, Maharashtra | A bus caught fire on the Pune-bound lane of the Mumbai-Pune Expressway. Fire brigade teams from the Panvel Municipal Corporation and Khopoli Municipal Council rushed to the spot and brought the blaze under control. There were 14 passengers on… pic.twitter.com/ONfSuVJXke
— ANI (@ANI) September 24, 2026
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी फायर टेंडर घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान, बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेची दखल घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
