अलिबाग- चौदा तास उलटले तरी मुंबई पुणे दृतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघात ग्रस्त टँकर मधून गॅस गळती रोखण्यात अपयश आल्याने महामार्गावरील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे.
मुंबई पुणे दृतगती मार्गावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला होता. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. ही गॅस गळती रोखण्यात अजूनही प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे अपघात ग्रस्त टँकरही हटवता आलेला नाही.
टँकरमध्ये अतिशय ज्वलनशील प्रोपलीन गॅस असल्याने, महामार्ग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हजारो प्रवाशी अडकून पडले होते. रात्री बारानंतर पुणे मार्गिकेवरील एका लेनवर मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाश्यांची आणि वाहन चालकांची सुटका झाली. सध्या बोरघाट परिसरात अतिशय संथगतीने सध्या वाहतूक सुरू आहे.
पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाऊंडेशनची पथके घटनास्थळी दाखल घटनास्थळी आहेत. खोपोली येथील अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल आहे. गॅस गळती रोखण्यासाठीतज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले असून अपघातग्रस्त टँकर मधून गॅस गळती रोखण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप गॅस गळती थांबविता आलेली नाही. परिणामी मुंबई मार्गिका आडोशी बोगदा परिसरात बंद ठेवावी लागली आहे.
कसा झाला अपघात….
हा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्या जवळ एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटला. अपघातानंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली
जुन्या महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन
दृतगती महामार्गावरील वाहतुक विस्कळीत असल्याने, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाश्यांनी जुन्या महामार्गाचा अवलंब करावा असे आवाहन महामार्ग पोलीस विभागाने केले आहे. सध्या दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.

