Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. या मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, एकीकडे या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘वाईडेस्ट टनेल’ अर्थात जगतला सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद होत असताना दुसरीकडे खंडाळा घाटात आज सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघालेली वाहनं तासनतास घाटातच अडकून पडल्याचं दिसून आलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेलं विधान आता चर्चेचा विषय ठरलं आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
आज १ मे आणि पुढचे दोन दिवस शनिवार-रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पुण्याच्या दिशेनं मोर्चा वळवला होता. त्यामुळे घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच ही वाहनं घाटात खोळंबून राहिल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. त्यातच रणरणत्या उन्हात नागरिकांना ताटकळत बसावं लागल्यामुळे त्यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. उद्घाटनासाठी अडवून ठेवण्याऐवजी मिसिंग लिंक ताबडतोब खुला करून वाहतूक कोंडी सोडवावी, अशी अपेक्षा अडकलेल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकांचा संताप,पण तटकरे म्हणतात “थोडं दमानं घ्या”!
दरम्यान, एकीकडे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असताना दुसरीकडे सुनील तटकरेंनी त्यांना धीर धरण्याचं आवाहन केलं आहे. “ही वाहतूक कोंडी गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. ती दूर व्हावी म्हणूनच मिसिंग लिंकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं तयार केला आहे. लोकांनी थोडं दमानं घ्यावं. आज संध्याकाळपर्यंत सगळी ट्रॅफिक मोकळी झालेली असेल. आज शुक्रवार, एक मे आहे. सुट्यांमुळेही मोठ्या प्रमाणावर प्रवासी या रस्त्याने येतात. त्याच्यावरचाच रामबाण उपाय म्हणजे मिसिंग लिंक आहे”, असं म्हणत सुनील तटकरेंनी लोकांना संयम पाळण्याचं आवाहन केलं.
“इथे अडचणी आहेत. ही वाहतुकीची कोंडी आजच झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ही अडचण आहे. म्हणूनच या मिसिंग लिंकचा प्रकल्प सरकारनं हाती घेतला होता. काही क्षणांपुरता थोडाफार त्रास होणारच. यापेक्षा वेगळं काही अभिप्रेत आहे अशातला काही भाग नाही”, असंदेखील ते पुढे म्हणाले.
मिसिंग लिंकचं लोकार्पण, गिनिज बुकमध्ये नोंद
दरम्यान, मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर या मार्गाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. जगातला सर्वात रुंग बोगदा म्हणून मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकची नोंद करण्यात आली आहे.
